चिनी वस्तू विकणारा हा देशद्रोहीच : प्रमोद जठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 03:59 PM2020-06-19T15:59:27+5:302020-06-19T16:03:09+5:30
भविष्यात चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी कदाचित तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात जो चिनी वस्तू विकत असेल तो देशद्रोही ठरेल. अशा व्यक्तींना आता जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे केले.
कणकवली : चीनने कोविड-१९ हा विषाणू पसरवून एकप्रकारे विषाणू युद्ध सुरू केले आहे. त्या युद्धात कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या जीवावर हे आव्हान संपुष्टात आणले. अमेरिका, युरोपसह संपूर्ण जग भारताकडे चीनशी लढण्याची क्षमता असलेला देश म्हणून पाहत आहे. भविष्यात चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी कदाचित तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात जो चिनी वस्तू विकत असेल तो देशद्रोही ठरेल. अशा व्यक्तींना आता जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे केले.
कणकवली येथील भाजपा जिल्हा कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप सरचिटणीस मधुसूदन बांदिवडेकर, रवींद्र शेट्ये, बबलू सावंत, समर्थ राणेआदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रमोद जठार म्हणाले, कोविड-१९ मुळे संपूर्ण जग ग्रासला आहे. चीनची विषाणू निर्मिती ही युद्धनीती आहे. अमेरिका व युरोप या महासत्तांचे केंद्र भारताकडे वळले आहे. हे चीनच्या लक्षात आले आहे.
हिंदुस्थान या देशातील लोकसंख्येचा उपयोग करून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला महासत्ता बनवतील. हे चीन ओळखून आहे. तेव्हाच वुहान शहरात कोविड-१९ निर्मिती झाली. त्यावेळी चीनने विषाणू युद्ध केले, हे जगाच्या लक्षात आले, असेही प्रमोद जठार यांनी सांगितले.
३७० कलम रद्द केल्यानंतर चीनचे धाबे दणाणले
हिंदुस्थानातील नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व चीनला धडा शिकवेल. देशात प्रथमच भारतीय सैन्याला पूर्ण अधिकार दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी चिनी वस्तू विकू नयेत. आपला देशाभिमान जागरूक करावा. देशातील ३७० कलम रद्द केल्यानंतर चीनचे धाबे दणाणले आहेत, असेही जठार यांनी यावेळी सांगितले.
फोटो : प्रमोद जठार