सिंधुदुर्गात काळ्या फिती लावून व्यवहार, बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 02:08 PM2020-12-08T14:08:47+5:302020-12-08T14:11:04+5:30
BharatBand, FarmarStrike, Sindhudurgnews केंद्र शासनाच्या नव्या शेतकरी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात संमिश्र सुरू आहे. सिंधुदुर्गातील व्यापारी महासंघाने बंदला पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील व्यापारी काळ्या फिती लावून व्यवसाय करत असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी दिली.
सिंधुदुर्ग : केंद्र शासनाच्या नव्या शेतकरी कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात संमिश्र सुरू आहे. सिंधुदुर्गातील व्यापारी महासंघाने बंदला पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील व्यापारी काळ्या फिती लावून व्यवसाय करत असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी दिली.
शेतकरी कायद्याच्या विरोधातील भारत बंद आंदोलनाला मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटना, जलक्रीडा व्यावसायिक, श्रमिक मच्छीमार संघाने आपला पाठींबा दर्शविला आहे. सिंधुदुर्ग किल्ला दर्शन, जलक्रीडा प्रकार बंद ठेवण्यात आले आहेत.
मालवणात पर्यटकही मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत, मात्र त्यांना किल्ले दर्शन व जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटता न आल्याने हिरमोड झाला आहे. अनेक पर्यटकानी बंदरजेटी येथून किल्ले सिंधुदुर्गला अभिवादन केले. भारत बंदचा मालवण बाजारपेठेवर कोणताही परिणाम जाणवला नाही. बाजारपेठ गजबजली दिसून येत होती. पोलीस प्रशासनानेही प्रमुख नाक्यांवर चोख बंदोबस्त ठेवला होता.
ओरोस मुख्यालय चौकात रोजच्या प्रमाणे सर्व हॉटेल्स, इतर दुकानं सुरू आहेत. नागरिका,पर्यटकही मोठ्या संख्येने वर्दळ सुरू आहे. या ठिकाणी बंद पाळण्यात आलेला नाही. शिरगांव येथील बाजारपेठेत नेहमीप्रमाणे ग्राहकांची वर्दळ, सर्व व्यापारी अस्थापना, दुकाने सुरू आहेत.
दूध, भाजीपाला मुबलक प्रमाणात उपलब्ध असून बंदचा कोणताही परिणाम झालेला नाही, जनजीवन सुरळीत असून एसटी सेवाही सुरू आहेत. खारेपाटणमध्ये भारत बंदचा कोणताही परिणाम नाही. सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. कणकवलीतही नेहमीप्रमाणे वर्दळ दिसून येत आहे. कसाल गाव बाजारपेठ येथे नेहमीप्रमाणे सर्व दुकाने सुरु आहेत.