जमीन देकार पत्र कंपनी उपाध्यक्षांकडे सुपूर्द
By admin | Published: January 5, 2017 11:47 PM2017-01-05T23:47:27+5:302017-01-05T23:47:27+5:30
कोका कोलाचा चौथा प्रकल्प : एक हजार कोटीची गुंतवणूक
रत्नागिरी : हिंदुस्थान कोका कोला बेव्हरेजेस कंपनी कोकणातील अतिरिक्त लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे एक हजार कोटी रुपये गुंतवून नवीन प्रकल्प सुरू करणार आहे. या प्रकल्पासाठीचे जमीन देकार पत्र उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कंपनीचे उपाध्यक्ष (कॉर्पोरेट अफेअर्स) उमेश मलिक यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
या ठिकाणी ही कंपनी ज्यूस, बाटलीबंद पाणी व शीतपेये यांचे उत्पादन करणार आहे. कोका कोला कंपनीचा राज्यातील हा चौथा प्रकल्प असणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अतिरिक्त लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये या कंपनीस शंभर एकर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने देण्यात येणार आहे. या ठिकाणी कोका कोला कंपनी ज्यूस, बाटलीबंद पाणी व शीतपेये यांचे उत्पादन करणार आहे.
यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, उपकार्यकारी अधिकारी अविनाश ढाकणे, रत्नागिरीचे विभागीय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे, आदी उपस्थित होते. हिंंदुस्थान कोका कोलाच्या या प्रकल्पामुळे कोकणातही औद्योगिक संधी निर्माण झाल्या आहेत. उद्योग विभागाच्या औद्योगिक विकेंद्रीकरणाच्या धोरणामुळे कोकणात उद्योग येत आहेत.
मेक इन इंडियाअंतर्गत महाराष्ट्रात हिंंदुस्थान कोका कोला कंपनीने हा प्रकल्प उभारण्याचे ठरविले आहे.
सुमारे एक हजार कोटीहून अधिक रुपयांची गुंतवणूक येथे करण्यात येणार असून, हा संपूर्ण प्रकल्प पर्यावरणपूरक असणार आहे, अशी माहिती मलिक यांनी याप्रसंगी दिली. (प्रतिनिधी)
कोकणातील सहाशे युवकांना रोजगार
हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू होण्यासाठी उद्योग विभागामार्फत प्रयत्न करणार असल्याचे उद्योगमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पामुळे कोकणातील सुमारे ५०० ते ६०० युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
हिंंदुस्थान कोका कोला कंपनी कोकणात उभारणार प्रकल्प
कोकणातील ५०० युवकांना मिळणार रोजगार
राज्यातील चौथा प्रकल्प
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत एक हजार कोटींची गुंतवणूक