सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५२ पोलीस कर्मचार्यांच्या बदल्या
By admin | Published: May 29, 2014 12:36 AM2014-05-29T00:36:58+5:302014-05-29T00:37:10+5:30
४८ जणांना बढत्या : पोलीस अधीक्षकांची माहिती
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग पोलीस दलातील एकाच जागी सहा वर्षे कार्यरत असलेल्या ५२ पोलीस कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, तर ४८ जणांना बढत्या देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी आज, बुधवारी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार प्रथमत: एकाच जागी दोन वर्षे कार्यरत असलेल्या कर्मचार्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. मात्र, शासनाने याबाबत फेरनिर्णय घेत सहा वर्षे एका जागी कार्यरत असलेल्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता नव्याने बदली प्रक्रिया राबवून सहा वर्षे झालेल्या ५२ पोलीस कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, तर नऊ जणांना सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी, २३ जणांना पोलीस नाईकपदी, १६ जणांना हवालदारपदी अशा एकूण ४८ जणांना बढत्या देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी दिली. ६ जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील ५१ रिक्त जागांसाठी ६ जूनपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात आले होते. या पोलीस भरतीसाठी १८५५ एवढे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १६९४ अर्ज पात्र ठरले आहेत. ही पोलीस भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबविण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असून, ही भरती प्रक्रिया ६ जूनपासून १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी दिली. (प्रतिनिधी)