‘मांडवी’वर झाड कोसळले

By admin | Published: July 3, 2016 11:32 PM2016-07-03T23:32:25+5:302016-07-03T23:32:25+5:30

इंजिनचे नुकसान : जीवितहानी नाही; खेड स्थानकात तपासणी

The tree collapsed on 'Mandvii' | ‘मांडवी’वर झाड कोसळले

‘मांडवी’वर झाड कोसळले

Next

खेड : मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसच्या इंजिनच्या मागे असणाऱ्या वातानुकूलित बोगीवर झाड कोसळल्याने रेल्वे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. कोकण रेल्वे मार्गावरील करंजाडी आणि वीर स्थानकादरम्यान सापे वामने गावाच्या हद्दीमध्ये रविवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
हे झाड पडल्याने इंजिनचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेत इंजिनच्या मागील बोगीचे मोठे नुकसान न झाल्याने तेच इंजिन वापरून ही गाडी मार्गस्थ झाली. खेडमध्ये ही गाडी दुपारी २.१० वाजण्याच्या सुमारास आली. तेथे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गाडीची तपासणी केली. कोणा प्रवाशांना दुखापत झाली आहे का, याची माहिती घेतल्यानंतर ही गाडी साडेतीन वाजता पुन्हा मार्गस्थ करण्यात आली. मात्र, या घटनेमुळे या मार्गावरील मांडवी एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले.
मुंबईहून मडगावकडे जाणारी मांडवी एक्स्प्रेस ११.४० वाजता वीर स्थानकातून निघाली होती. करंजाडी आणि वीर स्थानकादरम्यान सापे वामने गावच्या हद्दीत रूळाच्या नजीक असलेले जुनाट वडाचे झाड गाडीच्या इंजिनवर कोसळले. हे झाड महाकाय होते. या घटनेमुळे गाडीच्या इंजिनलाही हादरा बसला. मात्र, झाड पूर्णपणे इंजिनवर न पडता इंजिनला घासल्याने इंजिन सुरक्षित राहिले; पण इंजिनला मोठा हादरा बसला आणि इंजिनच्या सर्व काचा फुटल्या.
हेच झाड पूर्णपणे इंजिनवर पडले असते तर किंवा रेल्वे रूळावर पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.
इंजिन सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर ही गाडी मडगावच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. पुढे खेड स्थानकात पूर्ण तपासणी झाल्यानंतर गाडी मडगावच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली.
२७ जून रोजी कामथे घाटात राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्याची घटना ताजी असतानाच आता सापे वामने गावाजवळ ही दुर्घटना घडल्याने गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे प्रवाशांचे बरेच हाल झाले.
(प्रतिनिधी)
 

Web Title: The tree collapsed on 'Mandvii'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.