बांद्यातील कालव्यात मातीसह झाडी
By Admin | Published: November 19, 2015 09:06 PM2015-11-19T21:06:29+5:302015-11-20T00:17:21+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : साफसफाईअभावी कालव्याचा प्रवाह बदलण्याची शक्यता
बांदा : बांदा येथून जाणाऱ्या तिलारी शाखा कालव्याची साफसफाईअभावी पूर्णपणे दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी कालव्यात माती कोसळली आहे. यावर्षी कालव्यातून पाणी सोडताना कालव्याची सफाई करणे गरजेचे आहे, अन्यथा कालव्यातील पाण्याचा प्रवाह बदलून तो फुटण्याचीही शक्यता आहे. बांदा परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष मिटविण्यासाठी तिलारीचे पाणी या परिसरात शाखा कालव्याच्या माध्यमातून आणण्यात आले आहे. मात्र, ठिकठिकाणी निकृष्ट काम झाल्याने या शाखा कालव्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे या कालव्यातून पाणी सोडण्यात आले नाही. दरवर्षी या कालव्याची दुरवस्थेत सतत वाढ होत आहे. सटमटवाडी येथे कालव्यावर दरड कोसळल्याने येथील कालवा धोकादायक बनला आहे. शिवाय निकृष्ट बांधकामानेही कालव्याला सुरुवातीपासूनच तडे गेले आहेत. मे २0१0 साली सटमटवाडी येथे पाणी चाचणी घेतानाच कालवा फुटला होता. यावर प्रशासनावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. प्रशासन मात्र मूग गिळून गप्पच राहिले. त्यानंतर सटमटवाडी येथे सातत्याने कालव्यावर दरड कोसळल्याने कालव्याचे काम बंद ठेवण्यात आले होते. या कालव्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच पावसाळ्यापूर्वी या कालव्यातील दरडीची माती न हटविल्यास कालवा कोसळण्याची शक्यता होती. या वृत्ताची दखल घेत कालवा विभागाने तातडीने कालव्यातील माती पावसाळ्यापूर्वी हटविली होती. मात्र, पावसाळ्यात पुन्हा या कालव्याची दुरवस्था झाली आहे.कालव्यामध्ये जंगली झाडांची वाढ झाली असून, कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. मात्र, गतवर्षी कालव्याची दुरुस्ती न करताच कालवा विभागाने मे महिन्याच्या अखेरीस या शाखा कालव्यातून डोंगरपाल येथून पाणी सोडले होते. मात्र, पाच वर्षांपूर्वी पाणी सोडताना बांदा-सटमटवाडी येथे कालवा फुटल्याने त्यावेळी कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आले.
...अन्यथा पाण्याचा अपव्यय
यावर्षी पाणीटंचाईची झळ अधिक जाणवणार असल्याने यावर्षी कालव्यातील पाणी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, कालव्याची डागडुजी तसेच साफसफाई करूनच कालवा विभागाने पाणी सोडण्याची गरज आहे. अन्यथा, शेतकऱ्यांसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अपव्यय होऊ शकतो. त्यामुळे कालव्यातील कचरा व मातीची साफसफाई तत्काळ करण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे.
कालव्यातील पाणी दूषित
कचऱ्यामुळे कालव्यातील पाणी पूर्णपणे दूषित झाले होते. कालव्याची दुरवस्था झाल्याने कालव्यातून काही ठिकाणी पाणी झिरपत असल्याने विहिरींमधील पाणी गढूळ झाल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केली होती.