जालियनवाला बाग हत्याकांडातील शहीद क्रांतिवीरांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:59 AM2019-04-15T11:59:58+5:302019-04-15T12:01:32+5:30
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या येथील अॅड. दत्ता पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजमध्ये कॉलेज व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जालियनवाला बाग
वेंगुर्ले : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या येथील अॅड. दत्ता पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजमध्ये कॉलेज व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जालियनवाला बाग हत्याकांडातील शहीद क्रांतिवीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
१० एप्रिल १९१९ रोजी सत्यपाल व सेपुद्दीन किचलू या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने तडिपार करण्याचे आदेश दिल्यानंतर अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरकडे या क्रांतिवीरांना माफी देण्याच्या मागणीसाठी गेलेल्या जमावावर ब्रिटिश सैन्याच्या एका तुकडीने गोळीबार केला. त्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनतेने पंजाबमध्ये ब्रिटिश सरकारच्या अस्तित्वाची जाणीव करून देणाºया टाऊन हॉलसारख्या इमारती पेटविल्या. त्यातील हल्ल्यात आठ ते दहा भारतीय क्रांतीवीर शहीद झाले व ब्रिटिश सरकारने पंजाबमध्ये मार्शल लॉ अर्थात जमावबंदी लागू केली.
योगायोगाने १३ एप्रिल रोजी ‘औसाखी’ हा हिंदू व शीख बांधवांचा सण असल्याने जालियनवाला बागेत त्या दिवशी जमावबंदी असतानाही दोन ते अडीच हजार लोक जमा झाले. त्यांच्यावर ब्रिटिश अधिकारी ब्रिगेडियर जनरल डायर याने जवळ जवळ सोळाशे बंदुकीच्या फैरी झाडल्या. त्यात हजारांपेक्षा जास्त भारतीय क्रांतिकारक शहीद झाले.
भारतीय इतिहासातीत हा काळा दिवस असून, आज या घटनेला शंभरवर्षे पूर्ण होत असल्याने त्या सर्व शहिदांना श्रध्दांजली देणे हे भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन इतिहासप्रेमी व कोकण इतिहास परिषदेचे सदस्य डॉ. संजीव लिंगवत यांनी वेंगुर्ले येथे केले.
यावेळी प्राचार्य डॉ. के. जी. केळकर, डॉ. पूजा कर्पे, डॉ. मनोज आरोसकर, डॉ. प्रिया मराठे, डॉ. सिध्दी सावंत, डॉ. सोनाली सावंत, डॉ. दीपाली देसाई, डॉ. संगीता मुळे, डॉ. सतीश पाटील, डॉ. श्रीराम हिर्लेकर, डॉ. रवी बुरुड, माधवराव हिंगोले, संतोष पाटील, दिलीप नाईक, यशवंत घाडी, गुरुनाथ आडेलकर, हरिश्चंद्र्र कोचरेकर, अॅलन डिसोजा आदी कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.