ट्रॉलर्सची ६२ खलाशांसह सुटका
By admin | Published: October 19, 2015 11:25 PM2015-10-19T23:25:54+5:302015-10-20T00:20:16+5:30
पोलिसांची मध्यस्थी : सिंधुदुर्ग हद्दीत मासेमारी न करण्याचे आश्वासन
मालवण : मालवण तळाशील किनारपट्टीवर आठ वाव खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या गोवा येथील दोन पर्ससीन ट्रॉलर्सना रविवारी सायंकाळी पारंपरिक मच्छिमारांनी पकडल्यानंतर सोमवारी दोन्ही ट्रॉलर्सचे मालक व पणजी ट्रॉलर्स संघटनेचे अध्यक्ष मालवणात दाखल झाले. त्यानंतर बैठक घेऊन पोलीस प्रशासनाने यावर यशस्वी तोडगा काढला. त्यानंतर ६२ खलाशांची सुटका केली.पारंपरिक मच्छिमारांनी या ट्रॉलर्सकडून बारा वावच्या तोडग्याचे उल्लंघन करून मासेमारी करताना मच्छिमारांच्या जाळ्यांचेही नुकसान केल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले यांच्या उपस्थितीत दोन्ही बाजंूच्या नेतेमंडळींनी आपली कोणतीही तक्रार नाही; मात्र यापुढे बारा वाव नव्हे, तर बारा नॉटिकल मैलांच्या आत गोवा पर्ससीनने मासेमारी करू नये, असे स्पष्ट केले.दरम्यान, यावेळी तळाशील येथील पारंपरिक मच्छिमारांनी जाळीच्या व बोटींच्या नुकसानापोटी आपल्याला दोन्ही ट्रोलर्सने दोन लाख रुपये द्यावेत, अशी मागणी केली. मात्र, गोवा ट्रॉलर्समालकांनी आपल्या ट्रॉलर्सवर पांरपरिक मच्छिमारांनी जीपीएस प्रणाली व अन्य साधन सामग्री फोडून दोन लाखांहून अधिकचे नुकसान केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ५० हजार या पलीकडे मदत देऊ शकत नाही, असे सांगितले. अखेर कोणत्याही स्वरूपात तडजोड न करता यापुढे गोवा पर्ससीन सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासेमारीस येऊच नये, अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली.
रविवारी सायंकाळी ६२ खलाशांसह यनामारिया (पणजी) व गोल्डन गोवा (वास्को) या दोन ट्रॉलर्सला पारंपरिक मच्छिमारांनी पकडले व मालवण बंदरात आणण्यात आले. चार महिन्यांपूर्वी गोवा येथे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर १२ वाव आत समुद्रात मासेमारी करणार नाही हा काढण्यात आलेला तोडगा यावेळी या ट्रॉलर्सनी पायदळी तुडवला. त्यामुळे या ट्रॉलर्सवर ठिय्या आंदोलन करताना गोवा मत्स्योद्योगमंत्र्यांनी मालवणात येऊन योग्य ती भूमिका स्पष्ट करावी, असे पारंपरिक मच्छिमारांनी स्पष्ट केले होते.
सोमवारी दोन्ही बोटींचे मालक मायकल परेरा (वास्को), दियोफ डिसोजा (पणजी) यांच्यासह पणजी ट्रॉलर्स संघटनेचे अध्यक्ष मिनीन अल्फान्सा व अन्य मंडळी मालवणात दाखल झाली. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी पोलीस प्रशासनाने दोन्ही मच्छिमारांनी समन्वय साधून तोडगा काढावा, असे सांगत शिष्टाई केली.
वादावर पडदा
दोन्ही मच्छिमारांतील वाद वाढत असताना काही नेतेमंडळींनी पोलीस निरीक्षकांसमोर भूमिका मांडली. आम्हाला वाद वाढवायचे नाहीत व तक्रारही करायची नाही. गोवा राज्यातील पर्ससीन घालून दिलेली बंधने पाळून मासेमारी करतील. पारंपरिक मच्छिमारांच्या हद्दीत येणार नाहीत. याबाबत गोवा राज्यात बैठक घेऊन सिंधुदुर्गातील मासेमारीबाबत नियमावलीची माहिती दिली जाईल, अशी तडजोड करत दोन्ही बाजूंकडून कोणतीही नुकसानभरपाई न घेता वादावर पडदा पडला. त्यानंतर पारंपरिक मच्छिमारांकडून पकडण्यात आलेले दोन ट्रॉलर्स व ६२ खलाशी यांची सुटका करण्यात आली. यावेळी पारंपरिक मच्छिमार विकी तोरसकर, छोटू सावजी, दिलीप घारे, बाबी जोगी, सन्मेश परब, आदी उपस्थित होते.
समुद्रात हत्यारांसह ‘आर या पार’ची लढाई
मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पर्ससीन हायस्पीड व मलपी ट्रॉलर्सचे अतिक्रमण होत आहे. ‘पर्ससीन’ संघर्षाविरोधात पारंपरिक मच्छिमारांच्या लढ्याला साथ देण्यासाठी मालवणातील ट्रॉलर्स एकवटले आहेत. ट्रॉलर्स व्यावसायिक व पारंपरिक मच्छिमार यांच्या संयुक्त बैठकीत ‘पर्ससीन’विरोधी ‘आर या पार’ची लढाई हत्यारांसह करण्याचा निर्णय घेतला. -/ वृत्त ७
दोन लाख नुकसानभरपाई द्या
गोवा ट्रॉलर्समालकांनी आम्हाला वाद नको, पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यांची नुकसानभरपाई आम्ही देतो, असे सांगितले. यावर तळाशील येथील मच्छिमारांनी आमच्या जाळ्यांचे नुकसान व गावातील मंदिरास मदत म्हणून दोन्ही ट्रॉलर्सनी मिळून दोन लाख रुपये द्यावेत. दोन्ही ट्रॉलर्सनी मिळून
५० हजार रुपये नुकसानभरपाई देऊ, असे स्पष्ट केले. यावर मच्छिमारांनी नकार दर्शविला.