परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलरचा धुमाकूळ, मासळीची लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 02:29 PM2018-12-01T14:29:11+5:302018-12-01T14:32:31+5:30
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सकडून मासेमारीची लूट दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
- महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सकडून मासेमारीची लूट दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मासेमारी लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासन किवा मत्स्य विभाग कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने दरदिवशी समुद्रातील मत्स्यसंपत्ती खरबडून नेण्याचे काम या लुटारूंकडून सध्या सुरू आहे. स्थानिक मच्छिमारांनी खोल समुद्रात परप्रांतीय हायस्पीड नौकांकडून मासळीची कशी लूट होत आहे. याचा एक व्हिडीओच व्हायरल केला आहे. दोन मिनीटांच्या या व्हिडीओत खोल समुद्रात सात ते आठ परप्रांतीय ट्रॉलर्स राजरोसपणे मासेमारी करताना दिसत असल्याने नेहमी मच्छिमारांची ओरड असणा-या घटनेवर प्रकाशझोत पडला आहे.
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर असलेल्या मासळीला देशाच्या विविध भागात मागणी आहे. त्यामुळे दक्षिणेकडील केरळ, कर्नाटक, तामिळनाडू येथील परप्रांतिय ट्रॉलर्स अत्याधुनिक यंत्रणेच्याव्दारे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर खोल समुद्रात येऊन बिनदक्तपणे मासेमारी करतात. मत्स्यविभाग गेली कित्येक वर्षे ही मासेमारी रोखू शकलेला नाही. कारण ती रोखण्यासाठी आणि खोल समुद्रात जाण्यासाठी त्या त-हेची अत्याधुनिक यंत्रणाच आपल्याकडे नाही. तर दुसरीकडे राज्यकर्त्यांची मानसिकता नाही.
अलिकडे गोवा राज्याने त्यांच्याकडे येणारी परराज्यातील मासळी पूर्णपणे बंद केली आहे. इन्सुलेटेड वाहनातून आल्याशिवाय मासे गोव्यात स्वीकारले जात नाहीत. कारण काही महिन्यांपूर्वी परराज्यातून आलेल्या मासळीमध्ये ती टिकविण्यासाठी फर्मालिनचा वापर केल्याचे स्पष्ट झाले होते. या औषधाचा वापर केल्यामुळे गोव्यात अनेकांना विविध आजार जडल्याचा नित्कर्ष आरोग्य विभागाच्या अहवालातही आला होता. त्यामुळे गोवा राज्याने परराज्यातील मासळी आणखीन काही महिने नस्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मालवण, देवगड आणि वेंगुर्ले येथील मासळी कुठे विकायची ? असा प्रश्न सध्या मच्छिमारांमध्ये आहे. त्यामुळे मच्छिमार मेटाकुटीस आले आहेत.