वाहतुक कोंडीमुळे जीव मेटाकुटीस, चौपदरीकरणाच्या कामामुळे अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 02:46 PM2019-05-10T14:46:55+5:302019-05-10T14:48:20+5:30
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम कणकवलीत सुरु असल्याने नरडवे नाका ते डिपीरोडपर्यंत सर्व्हिस रोडला लागून पत्र्याचे मोठ-मोठे बॅरीकेट्स महामार्ग ठेकेदाराने उभारले आहेत . त्यामुळे सर्व्हिस रोड अरुंद झाल्याने तसेच सध्याच्या उन्हाळी सुट्टीत वाढत्या वाहनांच्या संख्येने कणकवलीत गेले चार दिवस सर्वात जास्त वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.
कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम कणकवलीत सुरु असल्याने नरडवे नाका ते डिपीरोडपर्यंत सर्व्हिस रोडला लागून पत्र्याचे मोठ-मोठे बॅरीकेट्स महामार्ग ठेकेदाराने उभारले आहेत . त्यामुळे सर्व्हिस रोड अरुंद झाल्याने तसेच सध्याच्या उन्हाळी सुट्टीत वाढत्या वाहनांच्या संख्येने कणकवलीत गेले चार दिवस सर्वात जास्त वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांबरोबरच पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.
कणकवलीत मुंबई - गोवा महामार्गाबरोबरच आचरा रस्त्यावरही वाहतुक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. या वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी, प्रशासन लक्ष देणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून विचारला जात आहे. नरडवे नाका ते मुख्य चौकापर्यंत प्रवास करायचा म्हटल्यावर कणकवलीतील नागरिकांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघाताची शक्यता वाढली असून या रस्त्यावर आपला जीव केव्हा जाईल? हे सांगता येत नाही. अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.
या मुंबई -गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढत चालली आहे. त्याचे परिणाम वाहतूक कोंडीवर दिसुन येत आहेत. तसेच या महामार्गावर विक्रेते , व्यावसायिक यांचे अतिक्रमण देखील मोठया प्रमाणात झाले असुन त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे.
चौपदरीकरणकामाबाबत नाराजी
कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम करत असताना सर्वसामान्य जनता, वाहन चालक व पर्यटकांना त्रास होणार नाही याची काळजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने घेणे आवश्यक आहे. मात्र, महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी चौपदरीकरणाच्या कामासाठी आवश्यक तेवढी जागा मिळाल्यानंतर स्थानिक समस्यांकडे दुर्लक्ष केला आहे. त्याबद्दल कणकवलीकरांमध्ये मोठी नाराजी निर्माण झालेली असून त्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
शहरात वाहतूक पोलिसांची आवश्यकता!
कणकवली शहरातील मुख्य चौकात दोन वाहतूक पोलीस असतात. मात्र, डीपी रोड, छत्रपती शिवाजी चौक , नरडवे नाका याठिकाणी वाहतूक पोलिसांची आवश्यकता आहे. असे झाले तर वाहतुकीचे सुनियोजन होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.