चुका टाळण्याचा प्रयत्न करा
By admin | Published: February 13, 2015 10:17 PM2015-02-13T22:17:11+5:302015-02-13T22:56:02+5:30
शोयराज जीवन वाल्मिकी : कणकवली येथील जिल्हा काँग्रेस बैठकीत मार्गदर्शन
कणकवली : काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. या पक्षात सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना मानसन्मान दिला जातो. यापुढेही तो दिला जाईल. मागील काळात घडलेल्या चुका भविष्यात पुन्हा घडणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन केंद्रीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी शोयराज जीवन वाल्मिकी यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणी सदस्य तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी जानवली येथे झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, प्रांतिक सदस्य विकास सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष डी. बी. वारंग, डॉ. यावरअली शेख, डॉ. जयेंद्र परुळेकर, अशोक सावंत, महिला आघाडी अध्यक्षा प्रज्ञा परब आदी उपस्थित होते.
यावेळी वाल्मिकी म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो देशभक्तांनी अंगावर गोळ्या झेलल्या. कित्येक तरुण फासावर गेले आहेत. हे सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते.
प्रत्येक पदाधिकाऱ्याने ग्रामीण भागातील जनतेला रस्ते, पाणी, आरोग्य यासह इतर सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सर्वसामान्यांचे नेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता त्यांचे नेतृत्व मानत आहे. सिंधुुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी या नेतृत्वाचे हात बळकट करणे आवश्यक आहे. त्यासाठी आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करावा तसेच कार्यकर्त्यांमधील क्षमता सिद्ध करा. काँग्रेस पक्षात राहून राजकीय कुरघोड्या करणाऱ्या व पक्षविरोधी काम करणाऱ्यांची माहिती पक्षश्रेष्ठींकडे पुराव्यासहीत पाठविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सतीश सावंत, विकास सावंत, एम. के. गावडे, अस्मिता बांदेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सावंतवाडी येथील सुरेश परब यांची जिल्हा चिटणीस म्हणून निवड झाल्याबद्दल वाल्मिकी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी
केले. (वार्ताहर)
कार्यकर्त्यांचा सन्मान
काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षासाठी नेहमी कार्यरत असतो. विविध उपक्रम पक्षाच्या माध्यमातून तो राबवित असतो. अशा कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी त्यांचा यथोचित सन्मान केला पाहिजे असेही शोयराज जीवन वाल्मिकी यांनी बैठकीत सांगितले.