समाजातील विषमता मिटविण्यासाठी प्रयत्न करा
By admin | Published: June 14, 2016 11:17 PM2016-06-14T23:17:44+5:302016-06-15T00:07:15+5:30
प्रकाश आमटे : पाट येथील एस. एल. देसाई विद्यालयात सत्कार समारंभात प्रतिपादन
कुडाळ : समाजातील विषमता मिटविण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी पाट हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व पालकांना मार्गदर्शन करताना केले. यावेळी पाट येथील एस. एल. देसाई विद्यालय, संस्था व पाट पंचक्रोशीच्या वतीने आमटे दांपत्यांचा सत्कार करण्यात आला.
थोर समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी पाट येथील एस. एल. देसाई विद्यालय येथे सदिच्छा भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी सुसंवाद साधला. याप्रसंगी मानव संसाधन केंद्र पुणेचे जयवंत मंत्री, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक द. ना. प्रभू, संस्था उपाध्यक्ष लवू गावडे, कार्याध्यक्ष रामचंद्र रेडकर, कार्यवाह डी. ए. सामंत, खजिनदार देवदत्त साळगावकर, संस्था सदस्य सुधीर ठाकूर, नारायण तळावडेकर, गणपत नार्वेकर, विकास गवंडे, प्रशालेचे मुख्याध्यापक जी.व्ही वार्र्इंगडे, परुळे कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, आंदुर्ले माजी सरपंच आरती पाटील, महेश सामंत, अरुण सामंत, सचिन देसाई, परुळे उपसरपंच तेली, पाट सरपंच किर्ती ठाकूर, सुभाष चौधरी तसेच पाट पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रकाश आमटे दांपत्यांचा संस्था व पंचक्रोशीच्यावतीने सन्मान करून त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.
नि:स्वार्थीपणा व स्वत्व विसरून समाजकार्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या आमटे दांपत्याने यावेळी आपल्या कार्यातील खडतर प्रवासासंबंधी मनोगत व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी म्हणजे काय असते याचा प्रत्यक्ष अनुभव यावेळी विद्यार्थ्यांना आला.
‘हेमलकसा’ येथे आदिवासींना माणूस म्हणून जगण्यास शिकविताना आमटे दांपत्याला कोणकोणत्या प्रसंगांना व समस्यांना सामोरे जावे लागले याबाबत डॉ. प्रकाश आमटेंनी आपले अनुभव कथन केले. संपूर्ण आयुष्य साधेपणाने जगत कार्यरत राहिले. जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा ‘हेमलकसा’ येथे जरूर भेट देण्याचे विद्यार्थ्यांना आमंत्रण दिले.
याप्रसंगी आमटे उभयतांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देत जीवनातील पैलू उलगडले. दशक्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने त्यांच्या सामाजिक कार्यास सहाय्य व्हावे या हेतूने रोख रक्कम रुपये एक लाख देणगी स्वरूपात सुपूर्द केले. (प्रतिनिधी)
देशाचे नाव उज्ज्वल करा: मंदाकिनी आमटे
जे काम आपण करणार ते अगदी निष्ठेने करा व आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न करा असा मौलिक संदेश यावेळी मंदातार्इंनी विद्यार्थ्यांना दिला.