संगीत रंगभूमी जगण्यासाठी प्रयत्न करावेत
By admin | Published: November 20, 2015 11:13 PM2015-11-20T23:13:33+5:302015-11-21T00:20:43+5:30
रजनी जोशी, अरविंद पिळगावकर : खल्वायन संस्थेतर्फे संगीत नाट्य कार्यशाळा
रत्नागिरी : नाट्यसंगीत शिकावे, असा पालकांचा हट्ट असतो, पण केवळ गायन, संगीत न शिकता नाटकात अभिनयही केला पाहिजे, संगीत नाटक ही जिवंत कला असून, ती अविस्मरणीय आनंद देते. जगातील एकमेव मराठी संगीत रंगभूमी जगण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रामाणिक प्रयत्न करावेत. राज्यात सर्वत्र कायमस्वरूपी नाट्यसंगीत शिबिरे घेतल्यास त्याचा उपयोग होईल, असे मत संगीत रंगभूमीवरील प्रथितयश कलाकार रजनी जोशी आणि पं. अरविंंद पिळगावकर यांनी व्यक्त केले.
खल्वायन संस्था आयोजित संगीत नाट्य कार्यशाळेनिमित्त रत्नागिरीत आले होते, त्यावेळी ते बोलत होते. रजनी जोशी म्हणाल्या की, रंगशारदा संस्थेतर्फे शुभदा दादरकर, रामदास कामत, श्रीकांत दादरकर, अर्चना कान्हेरे, ज्ञानेश पेंढारकर आदी मंडळी २००८पासून नाट्यसंगीत अभ्यासवर्गात शिकवत आहोत. दादर, ठाणे, बोरिवली, पुणे, डोंबिवली या भागातून प्रशिक्षण वर्गाला प्रतिसाद मिळतोय. यातून नाटकांना नवे कलाकार मिळताहेत. जुनी नाटके उगाळत बसण्यापेक्षा नव्या संहिता रंगमंचावर येण्याची गरज आहे. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक नाटके रंगमंचावर येऊ शकतात. आमच्या परीने आम्ही संगीत रंगभूमी जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, शिबिरेही आयोजित करून शिकवत आहोत.
यावेळी पंडित पिळगावकर यांनी सांगितले की, शास्त्रीय संगीत शिकल्यानंतर नाट्यसंगीत शिकताना फायदा होतो. संगीत नाटकात काम करण्यासाठी ध्येयाने प्रेरित झालेल्या कलाकारांची गरज आहे. आमच्या काळात आम्ही अशीच कामे केली. सध्या टी. व्ही., मोबाईल व झटपट प्रसिद्धीमुळे नाटक पाहायला रसिक येत नाहीत. यामुळे तोट्यात नाटक चालवणे परवडत नाही. आम्ही गाणे शिकू, पण संगीत नाटकात काम करणार नाही, असे काहीजण सांगतात. अनेक कलाकारांना नाट्यसंगीत, संगीत नाटकांमुळे यशोशिखरावर जाण्याची संधी मिळते. त्यामुळे युवा कलाकारांनी याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे. संगीत नाटकांना आज सुगीचे दिवस आहेत, त्यामुळे नाट्य कलाकारांनी संगीत नाटकातून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केल्यास यश मिळेल. (प्रतिनिधी)
रजनी जोशी व पिळगावकर यांनी सन १९६३मध्ये यशवंतराव होळकर या एकाच नाटकातून संगीत रंगभूमीवर पदार्पण केले. रजनी जोशी या व्यावसायिक संगीत रंगभूमीवर १९६३पासून कार्यरत आहेत. पद्मश्री डॉ. दाजी भाटवडेकर यांच्याकडून त्यांना अभिनयाचे प्रशिक्षण मिळाले. तसेच वामनराव सडोलीकर, गोविंंदराव अग्नी, निवृत्तीबुवा सरनाईक, माणिक वर्मा या दिग्गज गुरुंकडून त्यांना शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन लाभले. त्यांना नाट्यसंगीताचे प्रशिक्षण कृष्णराव घाणेकर, अनंत दामले, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून मिळाले. महाराष्ट्र शासनाचा बालगंधर्व पुरस्कार, संगीत रंगभूूमीच्या प्रदीर्घ सेवेबद्दल विद्याधर गोखले पुरस्कार, छोटा गंधर्व, राम मराठे, माणिक वर्मा पुरस्कार तसेच म्महाराष्ट्र भूषण पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
अरविंंद पिळगावकर यांनी १९६४ साली रंगभूमीवर पदार्पण केले. १९६७ साली संगीत वासवदत्ता हे त्यांचे संगीत रंगभूमीवरील पहिले नाटक. आजवर त्यांनी सं. स्वयंवर, विद्याहरण, सौभद्र, मानापमान, संशयकल्लोळ, धाडीला राम तिने का वनी, मृच्छकटिक, कान्होपात्रा, बावनखणी, शारदा, वसंतसेना, पुण्यप्रभात, भावबंधन आदी नाटकांतून गायक नट म्हणून भूमिका केल्या. पं. के. डी. जावकर, पं. अभिषेकी, पं. गोविंदराव अग्नी यांच्याकडून गायनाचे तसेच डॉ. दाजी भाटवडेकर यांच्याकडून अभिनयाचे शिक्षण त्यांना मिळाले. बालगंधर्व, पं. अभिषेकी, पं. दिनानाथ मंगेशकर रंग गौरव, प्रदीर्घ नाट्य सेवा गौरव, केशवराव भोसले आदी पुरस्कार व महाराष्ट्र शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कारही मिळाला आहे.