नोकरीचे पैसे टिव्हीतून वसूल करण्याचा प्रयत्न
By admin | Published: April 16, 2015 10:17 PM2015-04-16T22:17:44+5:302015-04-17T00:22:15+5:30
सावंतवाडीतील घटना : ग्रंथपालच्या नोकरीसाठी सव्वा लाख दिले
कुडाळ : गं्रथपालाची नोकरी लावतो म्हणून सांगत मुन्नीश्वर हजारे (रा. गारगोटी कोल्हापूर) नामक युवकाकडून १ लाख २० हजार रूपये सावंतवाडीतील दिनानाथ नाईक यांनी घेतले होते. पण नोकरी न लावल्याने यातील काही रक्कम हजारे यांना नाईक यांनी परत दिली. मात्र, तगादा लावूनही उर्वरित रक्कम न दिल्याने दिनानाथ नाईक यांच्या घरातील टिव्ही उचलून नेण्यात आला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोघांना बोलावून घेतले. यावर तोडगा काढण्यात आला. या दोघांचेही जबाब नोंदवले आहेत.
येथील एका संस्थेत दिनानाथ नाईक कार्यरत होते. मुन्नीश्वर हजारे हे गं्रथपालचे शिक्षण घेण्यासाठी सावंतवाडीत येत असत. त्यावेळी नाईक यांनी हजारे यांना मी तुम्हाला नोकरी लावतो, या संस्थेत ग्रंथपाल पद रिक्त आहे, असे सांगितले होते. त्यामुळे २०११ मध्ये हजारे यांनी नाईक यांच्या मागणीनुसार नोकरी लावण्यासाठी १ लाख २० हजार रूपये दिले होते. मात्र, गेल्या तीन चार वर्षात हजारे यांना नोकरीच लावण्यात आली नाही.
त्यामुळे संतापलेल्या हजारे यांनी तुम्ही नोकरी लावत नसाल तर मी दिलेली रक्कम परत द्या, असा सतत तगादा लावला त्यामुळे नाईक यांनी वेळोवेळी यातील काही रक्कमही हजारे यांना दिली. मात्र, सर्व रक्कम दिली नाही. मुन्नीश्वर हजारे हे सतत गारगोटी येथून सावंतवाडीत येत पैशांची मागणी करीत असत पण नाईक यांनी हे पैसे दिले नाही त्यामुळे चार दिवसांपूर्वी हजारे हे कुटुंबासहित सावंतवाडीत येत दिनानाथ नाईक हे राहत असलेल्या घरात जाऊन घरातील टिव्हीसह अन्य वस्तू उचलून घेऊन गेले. यावेळी नाईक हे मुंबईला गेले होते. शुक्रवारी नाईक हे सावंतवाडीत दाखल झाल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मुन्नीश्वर हजारे यांना बोलावून घेतले. ते आज सायंकाळी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आल्यानंतर घडलेली हकीगत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांना सांगितली. शेलार यांनी दोघांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर नाईक यांनी आपण हजारे यांना बहुतांशी रक्कम अदा केली असून काही रक्कम शिल्लक आहे. ती लवकरच देणार असल्याचे कबूल केले. तसेच घरातून परस्पर साहित्य उचलून नेल्याबद्दल हजारे यांना समज देत दोघांचेही जबाब नोंदवले. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. (प्रतिनिधी)