शेर्पे येथे तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न
By admin | Published: January 16, 2016 11:33 PM2016-01-16T23:33:36+5:302016-01-16T23:33:36+5:30
हायस्कूल, स्टेशनरी दुकानातही चोरी : काळेश्वरी मंदिरातील दानपेटी फोडली
खारेपाटण : तालुक्यातील शेर्पे या गावी शुक्रवारी मध्यरात्री अज्ञाताने तीन ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला. शेर्पे माध्यमिक विद्यालयाचे कार्यालय, हेमंत पवार यांचे स्टेशनरी दुकान तसेच काळेश्वरी मंदिरातील दानपेटी फोडण्यात आली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेर्पे येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शेर्पे माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील तीन कपाटे खोलून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त पसरून टाकले तर कपाटातील लॅपटॉप बाहेर टेबलावर काढून ठेवला. किरकोळ पैशांची चोरी केली. मात्र कार्यालयात किंमती असणारे संगणक व लॅपटॉप, महत्वाचे कागदपत्र न घेता निघून गेला. याठिकाणी कोयता सापडला. ही बाब मुख्याध्यापक एच. एन. अत्तार यांनी ग्रामस्थांच्या सकाळी शाळा उघडल्यावर निदर्शनास आणून दिली. खारेपाटण-शेर्पे रस्त्यावर शेर्पे हायस्कूल परिसरात हेमंत पवार यांच्या मालकीचे स्टेशनरी दुकान फोडले व दुकानाच्या आतील रोख रुपये ५०० व चिल्लर लंपास केली. दुकानाचा दरवाजा फोडण्यासाठी वापरण्यात आलेले टिकाव दुकानाच्या बाजूस टाकलेले होते. तसेच श्री देवी काळेश्वरी मंदिराची दानपेटी फोडून आतील रक्कम चोरून नेली.
ही घटना मध्यरात्री घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी स्थानिक सरपंच संजय कापसे, ग्रामस्थ व पोलीस हवालदार रावराणे यांनी घटनेचा पंचनामा केला व अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. सायंकाळी ७.३० वाजता कणकवली येथून श्वानपथक व ठसेतज्ञ शेर्पे येथे दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत श्वानाने घटनास्थळ परिसरात माग काढला.
शेर्पे येथील तिन्ही ठिकाणच्या चोऱ्या एकाच व्यक्तीने केल्या असल्याचा दाट संशय पोलीस व ग्रामस्थांच्यावतीने व्यक्त केला जात आहे. अज्ञात चोर हा भुरटा चोर असून पैशाच्या हव्यासापोटी त्याने केलेला हा प्रयत्न असल्याचे घटनेवरून प्रथमदर्शनी दिसते. खारेपाटण पोलीस स्टेशनचे रावराणे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
शेर्पे गावात १ वर्षापूर्वी मंदिरातील फंडपेटी देवीचा उत्सव झाल्यानंतर अज्ञात चोरट्याने फोडली होती. मात्र त्यावेळी कोणतीही तक्रार दाखल न केल्यामुळे पुन्हा अशाप्रकारची चोरी करण्याचे धाडस चोरट्याने केल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे.