सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर स्मारक उभारण्याचा प्रयत्न
By Admin | Published: May 22, 2015 10:12 PM2015-05-22T22:12:42+5:302015-05-23T00:35:14+5:30
प्रमोद जठार : मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाकरिता एमटीडीसीच्या माध्यमातून १०० कोटींचा आराखडा बनविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून याअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांच्या सुशोभिकरणासाठी निधीची मागणी करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील खडकावर दर्यावर्दी स्वरूपातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची संकल्पना असून यासाठी आवश्यक १० कोटी रूपये निधीची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी मालवण येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
येथील भाजपा कार्यालयात माजी आमदार प्रमोद जठार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, विलास हडकर, भाऊ सामंत आदी उपस्थित होते. प्रमोद जठार म्हणाले, एमटीडीसीमार्फत बनविण्यात येणाऱ्या पर्यटन स्थळांच्या विकासाकरिता निधीची मागणी आपण करणार आहोत. यामध्ये विजयदुर्ग किल्ल्यामध्ये लाईट अॅण्ड साऊंड सिस्टीम प्रोजेक्टसाठी ५ कोटी, देवगड किल्ला सुशोभिकरणसाठी ८ कोटी, वैभववाडी येथील नापणे धबधबा परिसर सुशोभिकरणासाठी २ कोटी, कुणकेश्वर मंदिरासाठी भव्य गेट, पार्कींग व्यवस्था, शौचालय सुविधा निर्माण करण्यासाठी कणकवली येथील गोपुरी आश्रम कलाग्रामसाठी निधीची मागणी करण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची संकल्पना आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील एका मोठ्या खडकावर दर्यावर्दी स्वरूपातील शिवरायांचे भव्य स्मारक उभारले जाईल. २०१७ मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यास ३५० वर्षे पूर्ण होत असून यावेळी या स्मारकाचा भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येईल. या स्मारकासाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रेरणोत्सव समितीने प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे सुपूर्द करावा, असेही जठार म्हणाले.
बाबा मोंडकर यांनी, मालवण नगरपालिकेतर्फे चिवला बीच येथे निर्माण करण्यात येणाऱ्या वॉटर स्पोर्टस अॅण्ड आऊटडोअर गेम्स प्रकल्पासाठीही या आराखड्यात १ कोटी रूपये निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)