जाधव यांना संकुलात स्टॉल देण्यासाठी प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 06:20 PM2021-04-08T18:20:44+5:302021-04-08T18:21:43+5:30
Sawantwadi Sindhudurg-सावंतवाडी नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात रवी जाधव यांना जागा देण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल. तसा प्रस्ताव नगरपालिका बैठकीत आणून विशेष बाब म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे तो मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असे आश्वासन बुधवारी नगराध्यक्ष संजू परब व मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी दलित पँथर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भाई जाधव यांना दिले आहे.
सावंतवाडी : नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात रवी जाधव यांना जागा देण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल. तसा प्रस्ताव नगरपालिका बैठकीत आणून विशेष बाब म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे तो मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असे आश्वासन बुधवारी नगराध्यक्ष संजू परब व मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी दलित पँथर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भाई जाधव यांना दिले आहे.
याबाबत दलित पँथरच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेत येऊन नगराध्यक्षांची भेट घेत स्टॉलची मागणी केली होती. यावेळी कोकण प्रदेशाध्यक्ष विजय जाधव, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विश्वास कांबळे, निखिल मोहिते, दयानंद कांबळी यांच्यासह माजी नगसेवक संजय पेडणेकर, तानाजी वाडकर, सुनील पेडणेकर आदी उपस्थित होते.
दलित पँथरचे भाई जाधव म्हणाले, रवी जाधव हा एक दलित समाजातील तरुण आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय करू नका. त्याला न्याय द्या. या मागणीला मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर नगराध्यक्ष परब यांच्याकडे हा विषय मांडण्यात आला.
यावेळी परब म्हणाले, आपण पालिका बैठकीत ठराव घेऊन पुढील निर्णय घेऊ. पुन्हा या पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी चर्चा केली यात जाधव यांच्यावर पालिकेकडून अन्याय झाला आहे. त्यामुळे त्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच त्यांची मागणी पालिका प्रशासन ऐकत नसल्यास त्या ठिकाणी डीक्रीच्या जागेत असलेले सर्व गाळे काढूून टाकण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी आपण पालिका प्रशासन व नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून ओटे देण्याचे मान्य केले होते. मात्र, त्यांनी ते नाकारले होते, असे मुख्याधिकारी जावडेकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर आपण याबाबत नगराध्यक्षांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. नगराध्यक्ष परब यांच्याशी चर्चा केली. यावेळी ठरल्याप्रमाणे जाधव यांना पालिकेच्या संकुलात गाळा देण्याबाबत सकारात्मक ठराव पालिकेच्या बैठकीत घेण्यात येईल. तो ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे परब यांनी सांगितले. दरम्यान, बैठक सुरू असतनाच किरकोळ कारणाने नगरसेवक व स्टॉलधारक रवी जाधव यांच्यात तू तू-मै मै झाले. त्यानंतरही नगराध्यक्षांनीही बाजू सावरून धरत आम्ही मागणीचा विचार करू, अशी ग्वाही दिली