जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न
By admin | Published: June 26, 2015 10:12 PM2015-06-26T22:12:54+5:302015-06-27T00:22:13+5:30
गिरीष बापट : कासार्डे येथील संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन
नांदगाव : सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले अन्न व नागरी पुरवठा हे खाते माझ्याकडे आहे. विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळत नाही. सरकारी यंत्रणांच्या चुकांमुळे गरीब लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील कार्ड नसल्याने शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित आहेत. हे चित्र बदलण्यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे आणि या खात्याचे स्वरूप पालटण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. या विभागाच्या विविध समस्या कार्यकर्त्यांनी माझ्यापर्यंत लेखी स्वरूपात द्याव्यात. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केले.
कासार्डे येथील अभिषेक मंगल कार्यालयामध्ये आयोजित कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रमप्रसंगी मंत्री बापट बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार प्रमोद जठार, अॅड. अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, राजन चिके, प्रमोद रावराणे, राजेंद्र म्हापसेकर, राजू राऊळ, संजय नकाशे, अमोल लोके उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री गिरीष बापट म्हणाले, गरीब जनता अजूनही दारिद्र्यरेषेखालील कार्डापासून वंचित आहे. श्रीमंतांचा दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये समावेश आहे. संपूर्ण यंत्रणेमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी व व्यवस्था बदलासाठी बायोमेट्रिक पद्धतीबरोबरच निरनिराळ्या उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुवा बनून काम केले पाहिजे. सरकार चालविणे सोपे काम नाही. अनेक समस्यांवर मात करून राज्याच्या विकासाच्या व समृद्धीच्या दिशेने न्यायचे आहे. त्यासाठी टीमवर्कची गरज आहे. आपला या मतदारसंघातील हक्काचा आमदार आपण निवडून आणू शकलो नाही ही सल मला बोचते आहे. याची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनाशी खूणगाठ बांधून त्यादृष्टीने सतर्क राहून आतापासूनच तयारी सुरू केली पाहिजे.
आपण स्वत: प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून संवाद साधण्याचा आपला प्रयत्न आहे. जेणेकरून संघटनेच्या कार्यात चैतन्य निर्माण होईल. कार्यकर्ते आपापल्या भागामध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून आपले वेगळे स्थान निर्माण करू शकतील. यादृष्टीने आपला प्रयत्न आहे. पुन्हा मी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी येणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी हसत-खेळत संवाद साधण्याबरोबर कार्यकर्त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे खेळीमेळीत दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.
याप्रसंगी माजी आमदार अॅड. अजित गोगटे, दोडामार्ग तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, राजन चिके, मानसी वाळवे, आदींसह कार्यकर्त्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागासंदर्भात प्रश्न मांडले.
माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते गिरीष बापट यांना मोठा हार घालून स्वागत करण्यात आले. जयदेव कदम यांनी सूत्रसंचालन केले. अतुल काळसेकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)
एपीएल कार्डधारकांना अन्नसुरक्षा कायद्यामुळे धान्यच मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यासाठी सरकारी यंत्रणांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.
-गिरीष बापट, अन्नपुरवठा मंत्री