देवबाग कर्ली खाडी पात्रातील त्सुनामी आयलंड पुनर्जीवित होणार, नीलेश राणेंकडून प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 05:57 PM2023-01-13T17:57:52+5:302023-01-13T17:58:15+5:30
ग्रामस्थ व व्यावसायिक यांनी व्यक्त केले समाधान
मालवण : देवबाग कर्ली खाडी पात्रातील त्सुनामी आयलंड गेल्या दोन वर्षांपासून पाण्यात पूर्ण बुडून नष्ट होत चालले आहे. जल पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेले हे आयलंड पुनर्जीवित व्हावे, यासाठी येथील पर्यटन व्यावसायिकांनी माजी खासदार नीलेश राणे यांचीही भेट घेऊन याबाबत लक्ष घालण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या उपास्थितीत मालवण येथे बैठक झाली.
पुणे येथील एका एजन्सी मार्फत त्सुनामी आयलंडचे सर्वेक्षण करून हे आयलंड पुन्हा अस्तित्वात येण्यासाठी उपाययोजनाचा अहवाल बनविण्याच्या सूचना नीलेश राणे यांनी दिल्या.एजन्सीमार्फत आजच प्रत्यक्ष पाहणीअंती दोन दिवसात अहवाल तयार केला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
सर्व्हेअंती अहवाल तयार होताच येत्या आठ दिवसांत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व अन्य प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नीलेश राणे यांच्या माध्यमातून त्सुनामी आयलंड प्रश्नी विशेष बैठक घेऊन त्सुनामी आयलंड सर्वेक्षण अहवाल सादर करून तातडीने उपाययोजना करण्याबाबत भूमिका मांडली जाणार आहे.
गतिमान हालचालींनी घेतला वेग
एकूणच नीलेश राणे यांनी त्सुनामी आयलंड प्रश्नी विशेष लक्ष दिले असून लवकरात लवकर त्सुनामी आयलंड पूर्वस्थितीत येण्यासाठी गतिमान हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबाबत ग्रामस्थ व व्यावसायिक यांनी समाधान व्यक्त केले आहे.