क्षयरोग, कुष्ठरोग सर्व्हे करण्यास आशा कर्मचाऱ्यांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:56 PM2020-12-03T16:56:06+5:302020-12-03T16:58:16+5:30
sindhudurg, kudal, ashaserveye मानधनात अनिश्चितता असल्याने हा सर्व्हे करण्यास कुडाळ तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. तसेच याबाबतचे निवेदनही कुडाळ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सादर केले आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा वर्कर्स व आशा गट प्रवर्तक कोरोना काळात घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या आरोग्याची माहिती संकलित करीत आहेत. हे काम सुरू असतानाच शासनाने आता क्षयरोग व कुष्ठरोग सर्व्हेही आशांनी करावा असे आदेश काढले आहेत. मात्र, या सर्व्हेच्या मानधनात अनिश्चितता असल्याने हा सर्व्हे करण्यास कुडाळ तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. तसेच याबाबतचे निवेदनही कुडाळ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सादर केले आहे.
आरोग्यासंबंधित अनेक योजनांची कामे आशा गट प्रवर्तक व आशा वर्कर्स करीत आहेत. सध्या कोरोना काळात आशा प्रत्येक घराघरात जाऊन सर्व्हे करीत आहेत. हा सर्व्हे सुरू असतानाच शासनाने आता क्षयरोग व कुष्ठरोग सर्व्हे करण्याची जबाबदारी आशांच्या पदरी टाकली आहे. तसेच हा सर्व्हे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले .
गतवर्षी हा सर्व्हे करण्यासाठी आशांना तुटपुंजे मानधन देण्यात आले होते. त्यावेळी हा सर्व्हे करण्यासाठीच्या मानधनात वाढ करण्याची मागणी आशा कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यावेळी पुढील सर्व्हेवेळी समाधानकारक मानधन दिले जाईल, असे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, मानधन वाढीबाबत शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी हे काम करण्यास नकार दिला आहे.
शासनाचे जखमेवर मीठ चोळण्याचे काम
क्षयरोग व कुष्ठरोग सर्व्हेसाठी आशांना वाढीव मानधन न देता त्यांना कमी मानधनात हा सर्व्हे करण्यास सांगून शासन आशांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, असा आरोप कुडाळ तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांनी केला आहेत. कुडाळ तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १३४ आशा कर्मचाऱ्यांनी सर्व्हे करण्यास नकार दिला आहे.