हर्णै बंदरात मासेमारी बंद
By admin | Published: October 11, 2015 10:19 PM2015-10-11T22:19:10+5:302015-10-12T00:30:28+5:30
दापोली तालुका : वादळाच्या इशाऱ्यामुळे नौका किनारीच
आंजर्ले : वादळाच्या इशाऱ्यामुळे हर्णै बंदरातील मासेमारी ठप्प झाली आहे. मच्छीमारांनी आपल्या नौका सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आडोशाला नांगर टाकून उभ्या केल्या आहेत. अनंत चतुर्दशीनंतर मासेमारीच्या दुसऱ्या हंगामाला सुरूवात झाली. या हंगामात खलासी वार्षिक मजुरीवर काम करतात. पावसाला सुरूवात होईपर्यंत हा हंगाम चालतो. अनंत चतुर्दशीनंतर चार दिवसांनी हर्णै बंदरातील मच्छीमारी नौका मासेमारीसाठी रवाना झाल्या होत्या. या कालावधीत सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी, सरंगा असे जास्त पैसे मिळवून देणारे मासे मिळत असल्याने आॅक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो. या हंगामात मुबलक मासे मिळाले नाहीत तर नौकामालक गाळात जातो. कारण कोणत्याही स्थितीत खलाशांची मजुरी त्याला द्यावीच लागते. त्यामुळे या काळात टिच्चून मासेमारी केली जाते. नुकतीच मासेमारीला सुरूवात झाली असताना वादळाचा इशारा मिळाल्याने दोन दिवसांपूर्वी हर्णै बंदरातील मच्छीमारी नौका सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आडोशाला उभ्या करण्यात आल्या आहेत, तर काहींनी आपल्या नौका सुरक्षिततेसाठी आंजर्ले खाडीत उभ्या केल्या आहेत. कारण वादळ झाल्यानंतर नौका सुरक्षिततेच्या दृष्टीने हर्णै बंदर कुचकामी ठरते. कारण हर्णै बंदरात सुसज्ज जेटी नाही. जेटीचा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडला आहे. परिणामी नौका सुरक्षित ठेवण्यासाठी त्या सुवर्णदूर्ग किल्ल्याच्या आडोशाला किंवा आंजर्ले खाडीत न्याव्या लागतात. दोन दिवस मासेमारी बंद असल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत वातावरण पूर्ववत होण्याची वाट मच्छीमार बघत आहेत. (वार्ताहर)
गेल्या दोन दिवसांमध्ये खलाशांची मजुरी, अन्नधान्याचा भत्ता अंगावर पडला आहे. आणि मासेमारी झालीच नसल्याने उत्पन्नालाही फटका बसला आहे. लवकरच वातावरण पूर्ववत व्हावे, अशी अपेक्षा आम्ही बाळगून आहोत.
-विष्णू पावसे,
मच्छीमार व नौकामालक