मतदान यंत्रांमुळे वाजले लोकसभा निवडणुकीचे बिगुल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 06:25 AM2018-12-23T06:25:07+5:302018-12-23T06:25:25+5:30
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने नव्याने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन मतदान प्रक्रियेसाठी आणल्या आहेत.
कणकवली : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने नव्याने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन मतदान प्रक्रियेसाठी आणल्या आहेत. त्या ‘वोटर व्हेरिफीयेबल पेपर आॅडिट ट्रे’ या मशीनचे प्रात्यक्षिक सिंधुदुर्गात सुरू करण्यात आले आहे. त्याची सुरुवात कणकवली विधानसभा मतदारसंघ २६८ मध्ये २४ डिसेंबरपासून प्रशिक्षित दोन टिमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही दोन पथके ३३० मतदान केंद्रांवर मतदारांना प्रशिक्षण व जनजागृती करणार असल्याची माहिती कणकवली प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी दिली.
कणकवली तहसील कार्यालय येथे व्हीव्हीपॅट यंत्राच्या प्रात्यक्षिकाचे सादरीकरण शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांसमोर निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले. यावेळी तहसीलदार संजय पावसकर, निवडणूक नायब तहसीलदार एस. एस. कडुलकर, मास्टर ट्रेनर, तलाठी दीपक पावसकर, एस. बी. जाधव, निलेश कदम आदी कर्मचारी उपस्थित होते.
व्हीव्हीपॅट व ईव्हीएम यंत्रांचे प्रशिक्षण व जनजागृती मतदारांमध्ये करण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅट या मशीनमध्ये डिस्प्ले आहे. ज्या उमेदवाराला मतदान केले त्याचे नाव डिस्प्लेवर मतदान केल्यानंतर ७ सेकंद दिसणार आहे. त्यानंतर त्याची स्लीप कट होऊन मशीनच्या बॉक्समध्ये पडणार आहे.
व्हीव्हीपॅट मशीनमध्ये १५०० मतदारांना मतदान करता येणार असून त्या केलेल्या मतदानाचा पुरावा म्हणून स्लीप त्या बॉक्समध्ये पडणार आहे. त्या स्लीपवर उमेदवाराचे नाव, उमेदवाराचे चिन्ह, उमेदवाराचा क्रमांक व व्हीव्हीपॅट मशीनचा नंबर दिसणार आहे. त्यामुळे निवडणूक मतदान प्रक्रियेत मतदारांमध्ये आणखीन विश्वासार्हता निर्माण होईल. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाने या मशीनची उपलब्धता केली असून आगामी निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार असल्याचे नीता सावंत-शिंदे यांनी सांगितले.
३३० केंद्रांवर प्रात्यक्षिकाची मोहीम
कणकवली विधानसभा मतदारसंघात दोन पथकांद्वारे ३३० केंद्रांवर प्रात्यक्षिकाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. व्हीव्हीपॅट मशीनद्वारे सर्वत्र मतदारांमध्ये जनजागृती ही दोन पथके करणार आहेत. या पथकांमध्ये दोन मास्टर ट्रेनर व प्रत्येकी ५ कर्मचारी असणार आहेत. दरदिवशी ४ केंद्रांवर हे व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. हे पथक कुठल्या दिवशी कुठल्या गावात जाणार याची जनजागृती तलाठी, कोतवाल, बीएलओ, ग्रामसेवक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मतदारांनी या मोहिमेत सहभाग दर्शवून व्हीव्हीपॅट मशीनची माहिती व प्रात्यक्षिक करावे, असे आवाहन नीता सावंत-शिंदे यांनी केले आहे.