साकव वाहून गेल्याने वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2015 11:58 PM2015-06-18T23:58:52+5:302015-06-19T00:26:21+5:30
जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच : भुईबावडा, करूळ घाटात दगड, माती रस्त्यावर
बांदा : बांदा परिसरात आज झालेल्या मुसळधार पावसाने तेरेखोल नदीला पाणी आल्याने बांदा-शेर्ले नदीतिरावर ग्रामस्थांनी श्रमदानाने बांधलेला साकव आज दुपारी वाहून गेला. साकव वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.
बांदा-शेर्ले नदीतिरावर शेर्लेवासियांनी पाच महिन्यांपूर्वी श्रमदानाने साकवाची उभारणी केली होती. गेले पाच महिने शेर्ले मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ बांद्यात येण्यासाठी या साकवाचा वापर करत. या साकवावरुन दर दिवशी शेकडो ग्रामस्थ प्रवास करत.
जूनच्या पंधरवड्यापर्यंत पावसाचा जोर नसल्याने या साकवाचा वापर स्थानिक करत. आज सकाळपासून बांदा परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने तेरेखोल नदीला पाणी आले. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहाने आज दुपारी साकव वाहून गेला. आज सकाळीपर्यंत या साकवावरुन स्थानिकांनी प्रवास केला. दुपारी नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर साकव पाण्याखाली गेला.
यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली असून शेर्लेवासियांना बांद्यात येण्यासाठी आता इन्सुली आरटीओ नाका मार्गे ६ किलोमीटरची पायपीट करीत यावे लागणार आहे. विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना याचा त्रास होणार आहे. यामुळे या नदीपात्रावरील पुलाच्या मागणीचा प्रश्न पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.
बांदा शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. शहरातील पत्रादेवी सिमेवरील लकरकोट व मिठगुळी परिसरात सुमारे वीस मिनीटे चक्रीवादळ झाले. यात लकरकोट येथील रमेश यशवंत आळवे यांच्या घराचे छप्पर, मंगलोरी कौले वाऱ्याने उडाल्याने नुकसान झाले. तसेच मागील पडवीवर झाड पडल्याने पडवीचा काही भाग कोसळला. तसेच संतोष गोविंद तारी यांच्या घराच्या मागील पडवीवर फणसाचे झाड पडल्याने पडवी पूर्णपणे कोसळली. तसेच तारी यांच्या मांगरावरदेखिल झाड पडल्याने मांगर जमिनदोस्त झाला. तसेच या परिसरातील कित्येक घरांचे किरकोळ नुकसान झाले. खासगी मालमत्तेचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या परिसरात फणस, आंबा, सागवानच्या झाडांच्या फांद्या ठिकठिकाणी पडल्या आहेत. या फांद्या बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
बांदा-पत्रादेवी मार्गावर वीज वितरण कंपनीच्या लाईनवर झाडे उन्मळून पडल्याने वीज वितरण कंपनीचे तब्बल दहा विद्युत खांब उन्मळून रस्त्यावर पडले. तातडीने वीज पुरवठा खंडित केल्याने मोठा अनर्थ टळला. वीज खांबाबरोबरच वीज वाहक तारा तुटल्याने तसेच वीज खांबावरील विजेचे दिवे तुटल्याने वीज वितरण कंपनीचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले
आहे. (प्रतिनिधी)
घाटमार्गावर दगड कोसळले
वैभववाडी तालुक्यात बुधवारी दुपारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा आणि करुळ घाटात किरकोळ प्रमाणात दगड आणि माती रस्त्यावर आली होती. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली नसली तरी काही प्रमाणात त्याचा वाहतुकीला त्रास होत होता. पावसाची संततधार सुरुच राहिल्यास दोन्ही घाटात दरडी कोसळण्याची शक्यता आहे.बुधवारी दुपारनंतर १२३ मि. मी. पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे घाटमार्गामध्ये दगड आणि माती रस्त्यावर आली होती. भुईबावडा आणि करुळ घाटातील रस्त्यावर आलेल्या दगडमातीमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली नसली तरी काही प्रमाणात वाहतुकीत अडथळा ठरत होता. घाटातील रस्ता कामगारांनी काही प्रमाणात दगडमाती बाजूला करून मार्ग सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला. अतिवृष्टीमुळे तालुक्यात नुकसान झाल्याची प्रशासनाकडे नोंद नाही.