मोर्लेत शेतकऱ्यावर टस्कराचा हल्ला; ग्रामस्थांमध्ये भीती : मोनू कुत्रीने जीव वाचविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 03:55 PM2020-06-01T15:55:57+5:302020-06-01T15:57:58+5:30
गावक-यांनी हत्तींच्या बंदोबस्ताबाबत वनविभाग ठोस पावले उचलत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे कोनाळ विभागप्रमुख संतोष मोर्ये यांनी वनक्षेत्रपाल दयानंद कोकरे यांच्याकडे वनकर्मचा-यांसोबत फटाके पाठवा. त्यांना नुसते पाठवू नका, असे सांगितले
दोडामार्ग : मोर्ले येथील काजूबागेत घुसलेल्या टस्कराने शेतकरी अनंत देसाई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही टस्कराने त्यांच्यावर हल्ल्याच्या प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांची इमानी कुत्री मोनूने मध्ये येत त्यांचा जीव वाचविला होता. यावेळीही मोनूने आणि देसाई व अन्य शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने त्यांचे प्राण वाचले. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान घडली.
मोर्लेतील झरीकडे पैलाड नावाचा भाग आहे. तेथे गावक-यांच्या काजूबागा आहेत. तेथे काहींनी नव्याने काजू लागवड करण्यासाठी पालापाचोळा साफ करून पूर्वतयारी सुरू केली आहे. देसाई यांची काजूबागही तेथे आहे. नेहमीप्रमाणे ते बागेत गेले होते. काजू गोळा करीत असताना तेथील झाडामागून अचानक टस्कर आला. त्याच्या ओरडण्याने घाबरून ते जीवाच्या आकांताने ओरडत पळाले. मोनू कुत्री जोरजोरात भुंकू लागली. त्यामुळे आजूबाजूचे शेतकरीही सावध झाले. काहींनी हत्तीच्या वावराचे फोटोही काढले. तसेच व्हिडिओही केले.
गावक-यांनी हत्तींच्या बंदोबस्ताबाबत वनविभाग ठोस पावले उचलत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे कोनाळ विभागप्रमुख संतोष मोर्ये यांनी वनक्षेत्रपाल दयानंद कोकरे यांच्याकडे वनकर्मचा-यांसोबत फटाके पाठवा. त्यांना नुसते पाठवू नका, असे सांगितले असता त्यांनी फटाके देण्यास असमर्थता दर्शवून फोन ठेवून दिला. त्यामुळे मोर्ये यांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्याशी संपर्क साधला.
त्यांनी फटाके देण्याची तयारी दर्शविली असली तरी शुक्रवारपर्यंत वनविभागाकडून फटाके देण्यात आले नव्हते. दरम्यान, त्या टस्कराने मोर्लेतील मुक्काम हलविला आहे. तो केर-भेकुर्ली किंवा निडलवाडीकडे गेला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.