Sindhudurg: तिलारी खोऱ्यात टस्कर परतला; शेतकऱ्यांची वाढली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 11:53 AM2023-12-09T11:53:54+5:302023-12-09T11:54:10+5:30
भाताची उडवी फस्त करण्याच्या भीतीने धास्ती
दोडामार्ग : गेल्या दोन महिन्यांपासून अज्ञातवासात गेलेल्या हत्तीच्या कळपातील टस्कर पुन्हा परतल्याने तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. त्याच्याकडून भाताची उडवी फस्त केली जाण्याच्या भीतीने बळीराजा धास्तावला आहे.
हत्तींचा तिलारी खोऱ्यात मागील वीस ते बावीस वर्षांपासून वावर आहे. पावसाळ्यात हे हत्ती या खोऱ्यातून निघून जातात. परिणामी, भयमुक्त झालेले शेतकरी भात, नाचणी पिकांची शेती करतात. पावसाळा संपल्यावर शेतकरी शेतीची कापणी करून त्यांची उडवी लावतो. त्यानंतर शेतात चवळी, मिरची व इतर प्रकारच्या भाज्यांची झाडे लावली जातात.
मात्र, पावसाळा संपतो न संपतो तोच गेलेले हत्ती या हंगामात तिलारी खोऱ्यात पुन्हा परततात व शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान करतात, तसेच काही वेळा हे हत्ती थेट अन्नाच्या शोधात लोकवस्तीतही घुसतात. यावेळी मात्र ग्रामस्थांची भीतीने पळता भुई थोडी होते.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
यंदादेखील तिलारी खोऱ्यातील हत्ती पावसाळ्यात गेले होते. मात्र, चार दिवसांपूर्वीच घाटीवडे, बांबर्डे परिसरात एका टस्कराचे आगमन झाले. त्यानंतर या टस्कराचे लोकवस्ती जवळ दर्शन झाले. टस्कराने येताच क्षणी केळी उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हत्तींना वेळीच रोखण्याची शेतकऱ्यांची मागणी
तसेच यंदा कापणी केलेल्या भातपिकांची अद्यापपर्यंत मळणी झालेली नसल्याने हे पिक टस्कर फस्त तर करणार नाही ना? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. सद्य:स्थितीत एकच टस्कर आला असला तरी त्याच्या मागोमाग इतर हत्तींचा कळप येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या हत्तींना वेळीच रोखण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.