विमा योजनेचे बारा प्रस्ताव मंजूर
By admin | Published: October 21, 2015 09:28 PM2015-10-21T21:28:20+5:302015-10-21T21:28:20+5:30
दोन फेटाळले : ११ प्रस्तावांना प्रतीक्षा
सिंधुदुर्गनगरी : शेतकरी जनता अपघात विम्याअंतर्गत या वर्षाअखेर ३७ प्रस्ताव हे विमा कंपनीकडे पाठवण्यात आले होते. त्यापैकी १२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, त्यांच्या वारसांना विम्यापोटी मिळणारी प्रत्येकी एक लाख रक्कम अदा करण्यात आली आहे. विमा कंपनीकडे अकरा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, दोन प्रस्ताव कंपनीने फेटाळले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विभागातील तंत्र अधिकारी, सांख्यिकी अरुण नातू यांनी दिली.नैसर्गिक आपत्तीमुळे काही शेतकऱ्यांचा मृत्यू होतो तर काहींना अपंगत्व येते. शेती व्यवसाय करताना घरातील कर्त्या व्यक्तीवर ओढवलेल्या अशा संकटांमुळे कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन बंद होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणारी शासनाची शेतकरी जनता अपघात विमा योजना आधार देणारी ठरली आहे.१ नोव्हेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत शेतकरी जनता अपघात विम्याचे प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवून त्याला मंजुरी दिली जाते. १ नोव्हेंबर २०१४ ते अद्यापपर्यंत विमा कंपनीकडे शेतकरी जनता अपघात विम्याचे ३७ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी १२ शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्रत्येकी १ लाख याप्रमाणे १२ लाखांचे धनादेश वितरीत करण्यात आले आहेत. तर कंपनीकडे ११ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यांमध्ये ७ प्रस्ताव प्रलंबित तर प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याचे कारण देत दोन प्रस्ताव कंपनीने फेटाळले आहेत. एखादा शेतकरी मृत झाला तर मृत झालेल्या दिवसापासून ९० दिवसांच्या आत शेतकरी जनता अपघात विम्याचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक, कृषी विभाग यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. क्षेत्रीय स्तरावरील कृषी पर्यवेक्षक यांनी आवश्यक ती कागदपत्रे गोळा करून विम्याचा प्रस्ताव जिल्हा कार्यालयाला पाठवणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
शेतकरी विमा : एक लाखाचा धनादेश--शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत सन २०१३-१४ या वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ मृत शेतकऱ्यांच्या वारसांना ३८ लाख रुपये एवढे आर्थिक सहाय्य विमा कंपनीकडून प्राप्त झाले होते. या संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे.
प्रस्ताव फेटाळले
शेतकरी अपघात विमाअंतर्गत दोन प्रस्ताव फेटाळण्यात आले असून, त्या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याचे कारण दाखवण्यात आले आहे.