कुडाळात नऊ प्रभाग महिलांसाठी राखीव
By admin | Published: January 16, 2016 11:49 PM2016-01-16T23:49:09+5:302016-01-16T23:49:09+5:30
नगरपंचायत आरक्षण जाहीर : सात प्रभाग खुले, ओबीसी पुरुषांसाठी दोन
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर झाली असून, अनुसूचित जातीच्या वॉर्ड क्र. ७ मध्ये महिला आरक्षण पडले आहे तसेच सर्वसाधारण महिलांसाठी पाच प्रभाग तर ओबीसी महिलांसाठी तीन असे नऊ प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. १७ पैकी ५ प्रभाग सर्वसाधारण गटासाठी तर दोन प्रभाग ओबीसी पुरुष गटासाठी आरक्षित झाले आहेत.
कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल आता काही दिवसांतच वाजणार असून, १७ सदस्य असलेल्या या नगरपंचायतीच्या वॉर्डनिहाय आरक्षणाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. ही आरक्षण सोडतीची प्रक्रिया शनिवारी कुडाळ पंचायत समितीच्या सभागृहात प्रांताधिकारी रवींद्र बोंबले व नायब तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी पहिल्यांदाच अनुसूचित जातीसाठी ७ क्रमांकाचा वॉर्ड निश्चित करण्यात आला असून, या वॉर्डमध्ये ९६९ लोकसंख्या आहे. त्यापैकी ४२३ एवढे मतदार आहेत. या मागासवर्गीयांच्या अनुसूचित जातीच्या ७ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये महिला आरक्षण पडले. तसेच यावेळी प्रांताधिकारी बोंबले म्हणाले की, अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी वॉर्ड नाही आहे. महिला ही सर्व आरक्षणेही येथील वॉर्डनिहाय लोकसंख्येवरून काढण्यात आलेली आहेत. या १७ जागांच्या नगरपंचायतीमध्ये नऊ महिला व आठ पुरुष उमेदवार असणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी उचलून आरक्षण जाहीर करण्यात आले.
१- सर्वसाधारण, २- सर्वसाधारण, ३- सर्वसाधारण, ४- ओबीसी पुरुष, ५- सर्वसाधारण महिला, ६- ओबीसी पुरुष, ७ - अनु.जाती महिला, ८- सर्वसाधारण, ९- सर्वसाधारण, १०- ओबीसी महिला प्रवर्ग, ११- सर्वसाधारण, १२- सर्वसाधारण महिला, १३- सर्वसाधारण महिला, १४- सर्वसाधारण महिला, १५- ओबीसी महिला, १६- सर्वसाधारण महिला, १७ - सर्वसाधारण. यावेळी सुनील भोगटे, संजय भोगटे, विनायक राणे, संध्या तेरसे, अभय शिरसाट, राजन नाईक, बबन बोभाटे, काका कुडाळकर, राजू राऊळ, बाबल गावडे, मनसे व इतर उपस्थित होते. (प्रतिनिधी)