खैरतोड प्रकरणातील फरार दोघा संशयितांना पकडले, वनविभागाची कारवाई
By अनंत खं.जाधव | Published: August 22, 2023 04:42 PM2023-08-22T16:42:47+5:302023-08-22T16:43:45+5:30
चौकशीअंती अटक
सावंतवाडी : क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात अनधिकृत पणे खैराची तोड प्रकरणातील फरार आरोपी संदीप रामा गावडे व विश्वास बाळा गावडे (दोघे रा.वेत्ये सावंतवाडी) या दोघाही आरोपींना पकडण्यात वनविभागाला यश आले. काल, सोमवारी त्यांना ताब्यात घेण्यात आले. तर यातील लहू गावडे हा सध्या जामीनावर बाहेर आहे.
इन्सुली येथील वनरक्षक संग्राम पाटील यांना क्षेत्रफळ मधील राखीव जंगलात फिरती करताना काही लोक खैराची तोड करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी भ्रमणध्वनीवरून कोलगाव वनरक्षक सागर भोजने यांना मदतीसाठी बोलवून घेतले. त्यानंतर या दोघांनी मिळून राखीव जंगलात खैरतोड करीत असलेल्या आरोपींवर झडप घालून रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला. पण यातील दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. तर तिसरा आरोपी लवू एकनाथ गावडे याला ताब्यात घेण्यात आले होते. सध्या तो जामीनावर बाहेर आहे.
फरार आरोपीचा शोध सुरू होता. ते वेत्ये येथील आहेत. त्यामुळे सावंतवाडी वनपरिक्षेत्राच्या टीमसह वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर पसार झालेल्याचा शोध घेत होते. त्यातच सोमवारी संदीप रामा गावडे व विश्वास बाळा गावडे हे दोघेही वनविभागाच्या पथकाला आढळून आले असून वनविभागाकडून त्याना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची अधिक चौकशी सुरू असून त्याना अटक ही करण्यात आले आहे अशी माहिती वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिली.
हा तपास सावंतवाडी उपवनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल-पृथ्वीराज प्रताप, प्रमोद राणे, वनरक्षक-संग्राम पाटील, सागर भोजने, अप्पासो राठोड, चंद्रकांत पडते हे करीत आहेत.