नकली दागिने देऊन बँकांची फसवणूक, कोल्हापुरातून दोघांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 01:30 PM2023-01-17T13:30:29+5:302023-01-17T13:31:07+5:30

पैशाच्या हव्यासापोटी केला गुन्हा

Two arrested from Kolhapur for defrauding banks by giving fake jewellery | नकली दागिने देऊन बँकांची फसवणूक, कोल्हापुरातून दोघांना घेतले ताब्यात

नकली दागिने देऊन बँकांची फसवणूक, कोल्हापुरातून दोघांना घेतले ताब्यात

googlenewsNext

सावंतवाडी : बनावट दागिने बनवून बँकांची फसवणूक करण्यामागे मोठे रॅकेट असल्याचे सावंतवाडी पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या सुवर्णकारासह पळून गेलेल्या दोघांना सावंतवाडी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा कोल्हापुरातून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीची संख्या तीन झाली आहे.

सागर ऊर्फ नरेंद्र नलवडे व अमोल फौजदार (दोघेही रा. कोल्हापूर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, पैशाच्या हव्यासापोटी आपण हा प्रकार केल्याची कबुली या दोघांनी पोलिसांना दिली.

आयसीआयसीआय बँकेत पाच दिवसांपूर्वी बनावट दागिने देऊन संशयित कर्ज मागण्यासाठी आले होते. यावेळी संबंधित दागिने हे बनावट असल्याचे लक्षात येताच बँक मॅनेजरने याबाबत सावंतवाडी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी रितेश माजीक याला तत्काळ अटक केली होती. मात्र, त्याचा अन्य एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला होता.

फरार साथीदाराचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक कोल्हापूर येथे पाठविले होते. तेथे सापळा रचून त्यास ताब्यात घेण्यात आले. यात सुवर्णकार अमोल फौजदार याचा समावेश असून, फरार झालेल्या सागर नलावडे यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांनी आपण पैशाच्या हव्यासापोटी हा गुन्हा केल्याचे सांगितले.

दरम्यान, यामागे मोठे रॅकेट असून, आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आपण ३० टक्के सोन्याचा अंश अन्य धातूत वापरून हे दागिने बनविले आहेत. सुवर्णकाराकडून एक लाख तीस हजार रुपयांचा दागिना विकत घेतला जातो. त्या बदल्यात सुवर्णकाराला देण्यात येणारी रक्कम ही कर्ज स्वरूपात बँकेकडून आल्यावर सुवर्णकाराला देण्यात येते. असा प्रकार बऱ्याच ठिकाणी करण्यात आला आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे गुन्ह्यातील आरोपींची संख्या तीन झाली आहे. रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना सोमवारी येथील न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Two arrested from Kolhapur for defrauding banks by giving fake jewellery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.