‘मातोश्री’ने मारले एका दगडात दोन पक्षी

By admin | Published: February 18, 2016 11:32 PM2016-02-18T23:32:42+5:302016-02-19T00:19:20+5:30

नवे पदाधिकारी नेमताना ठेवले अंधारात : मंत्री असूनही दीपक केसरकर संघटनेपासून लांबच

Two birds in a stone struck by 'Matoshree' | ‘मातोश्री’ने मारले एका दगडात दोन पक्षी

‘मातोश्री’ने मारले एका दगडात दोन पक्षी

Next

अनंत जाधव -- सावंतवाडी  -दीपक केसरकर हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले तेव्हा जिल्ह्यातील राष्ट्रवादीला चांगलाच सुरूंग लावला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत असताना मंत्रीपदाची तहान शिवसेनेने पूर्ण केली. हे करीत असताना केसरकरांना संघटनात्मक कामापासून दूरच ठेवले आहे. याचाच प्रत्यय शिवसेनेच्या जिल्ह्यातील संघटनात्मक बदलावेळी दिसून आला. शिवसेनेत दोन महिला पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या, पण याची पुसटशी कल्पनाही केसरकरांना देण्यात आली नसल्याचे पुढे आले आहे. ‘मातोश्री’ने यातून एका दगडात दोन पक्षी मारल्याचेच दिसून येत आहे.
दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्वाभिमानाच्या मुद्द्यावर दीड वर्षापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. जिल्ह्यातील राष्ट्रवादी केसरकरांच्या साथीने शिवसेनेत आली आणि हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच नेते फक्त राष्ट्रवादीत शिल्लक राहिले आहेत. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात नवीन संघटना उभी करण्यात यश येत नाही. खुद्द जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही लक्ष घातले. जिल्ह्याचे दौरे केले. पण, त्यांनाही हवे तेवढे यश आले नाही.
दीपक केसरकर यांची राजकारणातील नीती शिवसेनेने चांगलीच हेरली आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांनी सेनेत प्रवेश करताच जु्न्या शिवसैनिकांना मागे ठेवत केसरकरांचे प्रमोशन केले. त्यांना थेट राज्यमंत्री पदावर बढती देण्यात आली. मात्र, मंत्रीपद दिल्यानंतरही केसरकरांना जिल्ह्यातील शिवसेनेच्या संघटनेत मात्र हवे तसे लक्ष देता आले नसल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेच्या जिल्हा संघटकपदी जान्हवी सावंत व सावंतवाडीच्या तालुका संघटकपदी स्मिता माळवदे, तर कणकवलीच्या संर्पकप्रमुखपदी शंकर पार्सेकर यांची नेमणूक केली. यातील सावंत या केसरकर यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जात होत्या. पण, या निवडीवेळी केसरकर यांनाच अंधारात ठेवण्यात आले तर माळवदे यांच्या निवडीवेळीही हाच प्रकार घडला आहे. ज्या नगरपालिका निवडणुकीत केसरकर यांनी एक हाती सत्ता आणली तेथील शिवसेनेच्या महिला शहरप्रमुखाला बढती देताना साधे केसरकर यांनाच याची कल्पना न देणे हे आश्चर्य आहे.
‘मातोश्री’ने दीपक केसरकर यांना प्रशासकीय ताकद देत असतानाच संघटनात्मक जबाबदारी मात्र खासदार विनायक राऊत, संर्पकप्रमुख अरूण दुधवडकर व जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या खांद्यावर सोपवली आहे. त्यामुळे कुणाला पदे द्यायची आणि कुणाला द्यायची नाहीत हे सर्व हेच नेत ठरवत आहेत.
दीपक केसरकर यांचा राष्ट्रवादीतील अनुभव पाहता ‘मातोश्री’ने बाहेरून येणाऱ्या नव्या नेत्यांवर संघटनेची जबाबदारी दिल्यास त्याचा परिणाम भविष्यात संघटनेवर होऊ शकतो, हा धोका ओळखून त्यांना संघटनेपासून दूरच ठेवले आहे. यातून ‘मातोश्री’ने एका दगडात दोन पक्षी मारल्याचेही दिसून येत आहे.



शिवसेनेची राष्ट्रवादी होणार नाही : प्रशासकीय कामात अडकवले
२००४ साली नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूर्ण शिवसेनाच काँग्रेसमध्ये विलीन केली होती. हा अनुभव शिवसेनेला अभ्यास करायला लावणारा होता. त्यामुळेच केसरकर यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ घालून त्यांना प्रशासकीय कामात अडकवून ठेवले जात असतानाच दुसरीकडे मात्र संघटनेपासून पूर्णत: अलिप्त ठेवून भविष्यात शिवसेनेची राष्ट्रवादी होणार नाही, याचीही काळजी घेतली आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांना पक्षात घेऊन सेनेने आपली ताकद वाढवली आहे. पण, त्यांचे वजन मात्र पक्षाने कमी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला, म्हणजे त्यांना माहिती असणारच. माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो यांनीही ओरोस येथे जान्हवी सावंत यांचा सत्कार केला.
-वैभव नाईक
आमदार तथा जिल्हाप्रमुख शिवसेना

सेनेचे वजन वाढले
विधानसभा निवडणुकीच्या काळात दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीतून सेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी नारायण राणे यांना कडवी झुंज देत विजय मिळवला. त्यामुळे जिल्ह्यात सेनेचेच वजन वाढले आहे. राणे यांच्या पराभवानंतर दीपक केसरकर यांना मंत्रीपद देण्यात आले.

Web Title: Two birds in a stone struck by 'Matoshree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.