महाड दुर्घटनेतील दोन मृतदेह सापडले

By Admin | Published: August 20, 2016 12:07 AM2016-08-20T00:07:13+5:302016-08-20T00:13:19+5:30

संख्या ३0 वर : अजूनही नऊ जण बेपत्ताच

Two bodies were found in Mahad accident | महाड दुर्घटनेतील दोन मृतदेह सापडले

महाड दुर्घटनेतील दोन मृतदेह सापडले

googlenewsNext

दापोली / देव्हारे : महाड दुर्घटनेत पुरामध्ये वाहून गेलेल्या प्रवाशांपैकी आणखी दोघांचे मृतदेह शुक्रवारी १७ व्या दिवशी सापडले. एक मृतदेह वेळास (ता. मंडणगड) येथे, तर दुसरा केळशी (ता. दापोली) येथे सापडला. या दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांपैकी सापडलेल्या मृतदेहांची संख्या आता ३० झाली आहे. अजूनही नऊ प्रवासी बेपत्ता आहेत.
३ आॅगस्ट रोजी मध्यरात्री महाडमधील सावित्री नदीवरील पूल तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत दोन एसटी बसेस व एक तवेरा गाडी पुरामध्ये बेपत्ता झाली. ११ आॅगस्टला पहिली बस, १३ आॅगस्टला दुसरी बस आणि १४ आॅगस्टला तवेरा गाडी सापडली. त्यानंतर बेपत्ता प्रवाशांची शोधमोहीम थांबविण्यात आली होती. त्यामुळे ज्यांचे मृतदेह सापडले नाहीत, त्यांचे नातेवाईक सावित्री खाडीत श्रद्धांजली वाहून आपापल्या गावी निघून गेले होते. मात्र, शुक्रवारी दुपारी ३ वाजता वेळास आणि केळशी येथे दोन मृतदेह सापडले. स्थानिक ग्रामस्थांनी बाणकोट सागरी पोलिस ठाण्याला खबर दिली. त्यांनी हा मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे या मृतदेहाची ओळख पटविणे कठीण झाले आहे. याच समुद्र किनाऱ्यावरील केळशी व वेळासच्यादरम्यान दुसरा मृतदेह केळशी ग्रामस्थांना आढळला.
केळशीतील ग्रामसुरक्षा दलाचे प्रकाश खोत, संजय आग्रे, फय्याज बोरकर, सुरेंद्र कर्देकर (सरपंच केळशी), पप्पू मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते विजय साबळे घटनास्थळी दाखल झाले. विजय साबळे यांनी ६० फूट खोल दरीत उतरुन हा मृतदेह किनाऱ्यावर काढला.
हे मृतदेह महाड रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले आहेत. या मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. यापूर्वी २६ मृतदेह या दुर्घटनेत सापडले होते. शेवटचे दोन मृतदेह तवेरा गाडीत सापडले होते. त्या मृतदेहांची ओळखसुद्धा पटली होती. मात्र, शुक्रवारी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटणे शक्य नाही.
सहाव्या दिवशी दिसलेलेच मृतदेह
दुर्घटनेच्या सहाव्या दिवशी वेळास समुद्रकिनाऱ्यावर स्थानिकांना वेळास-केळशी दरम्यान दिसलेले हेच मृतदेह असावेत, असा अंदाज आहे. मात्र, त्यावेळी प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळापर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे हे दोन्ही मृतदेह समुद्राच्या ओहोटीबरोबर आत गेले असावेत, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Two bodies were found in Mahad accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.