तिच्यासाठी दोन भाऊच झालेत हात
By admin | Published: August 28, 2015 11:49 PM2015-08-28T23:49:54+5:302015-08-28T23:49:54+5:30
शंभर टक्के अपंग बहीण स्वत:हून काहीच करून शकत नसल्यामुळे तिला दुसऱ्यावरच निर्भर रहावे लागत आहे. त्यामुळे तिच्यासाठीही रक्षाबंधन सणाचे महत्व मोठे आहे.
रत्नागिरी : जन्मानंतर अवघ्या सहा महिन्यानंतर पोलिओने दोन्ही पाय व डावा हात गमावला. केवळ एकच हात बरा आहे. परंतु, पुर्णत: आईवडील व भावंडावर अवलंबून असलेली बहीण रक्षाबंधनादिवशी आपल्या भावाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करते. कारण शंभर टक्के अपंग बहीण स्वत:हून काहीच करून शकत नसल्यामुळे तिला दुसऱ्यावरच निर्भर रहावे लागत आहे. त्यामुळे तिच्यासाठीही रक्षाबंधन सणाचे महत्व मोठे आहे.
मूळत: बिजापूर येथील कमाल गवंडी यांचे कुटूंब गेली ४० ते ५० वर्षे संगमेश्वर येथे स्थायिक आहे. १९८३ च्या पुरातील नुकसानग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन नगर येथे पुनर्वसन करण्यात आले. गवंडी देखील तेव्हापासून पुनर्वसन नगरात स्थायिक आहेत. कमाल यांना तीन अपत्ये दोन मुलगे व एक मुलगी. दोन्ही मुलगे अल्पशिक्षित असून, गवंडी काम करतात. परंतु, मुलगी रेश्मा दोन्ही पाय व एका हाताने अपंग आहे. त्यामुळे ती पूर्णत: आईवर अवलंबून आहे.
स्वत:हून ती काहीच करू शकत नाही. कमाल यांची घरची स्थिती बेताची आहे. दोन्ही भावांच्या मजुरीवर घर चालत आहे. रेश्मा यांनी अपंग असून, सातवीपर्यत शिक्षण घेतले आहे. पुढील शिक्षणाची आवड इच्छा असतानासु्ध्दा अपंगत्वामुळे ती पूर्ण करू शकलेल्या नाहीत. शिवणकाम शिकून उदरनिर्वाह करावा तर उजव्या हातातही फारशी ताकद नसल्यामुळे तेही करू न शकत नसल्याची खंत रेश्मा यांना वाटते.
सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यामुळे रेश्मा यांना ‘रक्षाबंधन’ सणाचे फार महत्व वाटते. बहीण-भावांचे नाते राखीच्या धाग्यामुळे घट्ट बांधून राहते. परंतु, रेश्मा म्हणतात की, मी पूर्णत: परावलंबी आहे. आई माझे सर्व काही करित असली तरी भावंडांमुळे आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आज माझ्यासाठी माझे भाऊ सर्वकाही आहेत. मी पूर्ण अपंग असले तरी माझे दोन्ही भाऊ माझे दोन हात आहेत. त्यांच्या बळामुळेच माझ्यात आत्मविश्वास निर्माण होतो.
शासनाकडून रेश्मा हिला काही महिन्यांपूर्वीच ६०० रूपयांची पेन्शन दरमहा सुरू झाली आहे. शासनातर्फे अपंगासाठी मेळावे आयोजित करून त्यांच्या स्वालंबनासाठी प्रशिक्षणे आयोजित केली जावीत. अपंगानुरूप एखाद्या कामाचे प्रशिक्षण द्यावे, शिवाय वैद्यकीय उपचार केले जावेत, जेणेकरून स्वावलंबी होण्यासाठी काही अंशी का होईना मदत मिळेल अशी आशा रेश्मा हिने व्यक्त केली. आईवडील, भाऊ यांचा मला आधार आहे. माझ्यासारख्या अपंग मंडळींनाही आधार मिळावा, रक्षाबंधन सण हा विशिष्ट समाजापुरता मर्यादित नाही. प्रत्येक बहीणभावंडाचा आहे. माझ्यासाठी माझ्या भावंडांचे योगदान मोठे आहे, त्यामुळे माझ्यासाठी रक्षाबंधनाचा सण अनमोल आहे, अशी प्रतिक्रिया रेश्मा हिने व्यक्त केली.