कणकवलीसाठी सव्वा दोन कोटींचा निधी
By admin | Published: March 24, 2017 12:28 AM2017-03-24T00:28:01+5:302017-03-24T00:28:01+5:30
माधुरी गायकवाड यांची माहिती : मुख्यमंत्र्यांचे जनतेच्यावतीने मानले आभार ; क्रीडांगणासाठीही सकारात्मक निर्णय होईल
कणकवली : कणकवली शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. त्यासाठी आमचे विविध प्रकारे प्रयत्न सुरु आहेत. असे सांगतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली शहराला नागरी सुविधा पुरविण्यासाठी २ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती नगराध्यक्षा माधुरी गायकवाड व उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी येथील नगरपंचायत कार्यालयात गुरुवारी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नगरसेवक रूपेश नार्वेकर, सुशांत नाईक, नगरसेविका राजश्री धुमाळे, भाजप कणकवली शहर प्रभारी मधुसूदन परब उपस्थित होते.
यावेळी कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा माधुरी गायकवाड म्हणाल्या, कणकवली शहरातील नागरिकांना आणखी नागरी सुविधा पुरविता याव्यात यासाठी माजी आमदार प्रमोद जठार तसेच कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी नगरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधीच्या मागणीची दखल घेऊन नागरी सुविधा योजनेतून २ कोटी २५ लाखांचा निधी कणकवली शहरासाठी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहीतीही यावेळी गायकवाड यांनी दिली.
गायकवाड पुढे म्हणाल्या, या भरघोस निधीमुळे कणकवली शहर विकासाच्या कामांना वेग येणार आहे. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. वीज, रस्ते, पाणी पुरवठा अशा विविध सुविधा या निधीतून नागरिकांना पुरविण्यात येतील. त्याचबरोबर शहरासाठी आणखी विकास निधी द्यावा अशी मागणी पत्राद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे. शहरासाठी निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जनतेच्यावतीने आम्ही आभार मानतो. असेही त्या यावेळी म्हणाल्या.
कन्हैया पारकर म्हणाले, नगरोत्थान योजनेमधून शहरातील क्रीडांगण, उद्यान यासाठीही निधी मिळावा अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. याबाबतही सकारात्मक निर्णय होईल असा आम्हाला विश्वास आहे. कणकवली शहरातील विविध आरक्षणे विकसित करण्याचा आमचा प्रयत्न रहाणार आहे. त्यासाठी आरक्षणांबाबत संबधित जमीन मालकांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये मुडेश्वर मैदानाच्या जमीन मालकांचाही समावेश असणार आहे. बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल.
दलित वस्ती सुधार योजनेतून जिल्ह्याला सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात फक्त ८० लाखांचा निधी मिळाला होता. त्यातून आम्हाला साडे चौदा लाख रुपयांचा निधी शहरातील समाज मंदिरासाठी मिळाला होता. अजून ३२ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे यासह इतर कामासाठी दलितवस्ती सुधार योजनेतून ६३ लाख रुपयांच्या निधीची मागणी समाजकल्याण विभागाकडे आम्ही केली आहे.
यामुळे दलित वस्तीकडे दुर्लक्ष केला जात आहे. अशी बिनबुडाची वक्तव्ये कोणी करु नयेत. आम्ही सर्व समावेशक असून शहराचा विकास करताना सर्व समाजघटकाना बरोबर घऊन जाणार आहोत. कणकवली शहरातील नागरिकानीही सहकार्य करावे. असेही ते यावेळी म्हणाले.(प्रतिनिधी)