बालकांची दोन दिवसांची दीपावली
By admin | Published: November 8, 2015 11:14 PM2015-11-08T23:14:02+5:302015-11-08T23:37:16+5:30
आविष्कार संस्था : चारही दिवसांचे सण साजरे
रत्नागिरी : दिवाळीचा आनंद सामान्य मुलांना नेहमीच मिळतो. मात्र, समाजाने ज्या मुलांना उपेक्षित ठरविले आहे, अशा विशेष अपंगत्व असलेल्या मुलांनाही हा आनंद मिळवून देण्याच्या उद्देशाने मतिमंद मुलांसाठी कार्यरत असलेल्या येथील आविष्कार संस्थेच्या सौ. सविता कामत विद्यामंदिरमध्ये दोन दिवसांची दीपावली साजरी करण्यात आली. यावेळी या मुलांनी वसूबारस ते भाऊबीज असे चारही दिवसांचे सण या दोन दिवसात साजरे केले.
गुरुवारी सायंकाळी सात वाजता हे विद्यार्थी शाळेत आले. सर्वांच्या मदतीने शाळेची सजावट करण्यात आली. आकाशकंदील, पणत्या यांनी शाळा लखलखली. येथील सर्व शिक्षकवर्गाच्या मदतीने विविध मनोरंजनाचे कार्यक्रम करून उशिरा विद्यार्थी शाळेतच झोपी गेले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सर्व विद्यार्थी पहाटे उठले. शाळेचा शिक्षकवृंद आणि त्यांच्या मदतनीस यांनी या मुलांना अभ्यंगस्नान घातले. त्यानंतर वसूबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, भाऊबीज या दिवसांचे महत्व सांगून हे दिवसही साजरे करण्यात आले.
दीपावलीनिमित्त मुलांनी जलदुर्ग केला. तो पणत्यांनी उजळून टाकला. मुलांनी फुलबाजांचा आनंदही यावेळी घेतला. सर्व मुलांना औक्षणही करण्यात आले. त्यानंतर साऱ्यांनी फराळाचा मनसोक्त आनंद घेतला. संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका शमीन शेरे आणि सर्व सहकारी शिक्षकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी, मदतनीस यांच्या सहकार्याने या मुलांची दिवाळी आनंदात साजरी झाली.
या कार्यक्रमासाठी सामाजिक बांधिलकी जपत अनेक व्यक्तींनी सहकार्य केले. उटणे, सुगंधीत तेल, अत्तर, साबण या वस्तू या मुलांना देऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)