Sindhudurg: भेडलेमाड तस्करीबाबत आरोपींना दोन दिवसांची वन कोठडी
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 19, 2024 06:28 PM2024-06-19T18:28:14+5:302024-06-19T18:28:32+5:30
शासकीय वनात भेडलेमाडाच्या पानांची तोड
प्रथमेश गुरव
वेंगुर्ला : मातोंड येथील शासकीय वनात भेडलेमाडाच्या पानांची तोड करून तस्करी केल्याप्रकरणी सावंतवाडी वनविभागाच्या फिरत्या पथकाने तळवडे येथील बाबल लाडू परब व प्रकाश लाडू जाधव यांना मंगळवारी अटक केली होती. भेडलेमाडाच्या पानांची तोड ही मुंबई-पुणे येथे विक्रीच्या उद्देशाने पाठवण्यासाठी केली असल्याचे या आरोपींनी मान्य केले. दोन्ही आरोपींना बुधवारी वेंगुर्ला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली.
कोकणात आढळणारे भेडलामाड हे झाड जैवविविधतेला पोषक असून, महत्त्वाची खाद्याची भूमिका बजावते. आपल्या समृद्ध जंगलांमध्ये आढळणारे शेकरू, माकड, वानर, कटिंदर, वटवाघुळे यासोबतच हॉर्नबील, सुतारपक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी हे अन्न व निवाऱ्यासाठी या झाडावर अवलंबून असतात. यासोबतच दोडामार्गमध्ये आढळणाऱ्या वन्यहत्तीचे देखील हे आवडते खाद्य आहे. या झाडांच्या पानांचा वापर पुष्पगुच्छ तसेच मोठमोठ्या समारंभात शोभेसाठी वापर करतात. या पानांना पुणे-मुंबई येथे मोठी मागणी असल्याने काही स्थानिक नागरिक पैशांच्या आमिषाला बळी पडून भेडलेमाड तोड करून किंवा त्याची पाने काढून विक्री करताना दिसून येत आहेत.
आपल्या मालकी क्षेत्रात सुरु असलेली भेडलेमाड झाडांची व पानांची तोड रोखावी व शासकीय जंगल हद्दीत कुणी तोड करत असेल तर तात्काळ जवळच्या वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा १९२६ या टोल फ्री क्रमांकावर कळवावे, असे आवाहन सावंतवाडी वनविभागाकडून केले आहे. यादरम्यान आरोपीच्या बाजूने ॲड. सुनील मालवणकर यांनी तर वनविभागाच्या बाजूने फिरते पथक वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी युक्तिवाद केला.