विहिरीत पडलेल्या गव्याच्या दोन पिल्लांना जीवदान, मात्र एकाचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 07:05 PM2022-05-17T19:05:09+5:302022-05-17T19:05:44+5:30
सावंतवाडी : माजगाव मेट वाडा येथे गव्याची दोन पिल्ले विहिरीत पडल्याचे काल, सोमवारी निदर्शनास आले होते. या पिल्लांना बाहेर ...
सावंतवाडी : माजगाव मेट वाडा येथे गव्याची दोन पिल्ले विहिरीत पडल्याचे काल, सोमवारी निदर्शनास आले होते. या पिल्लांना बाहेर काढून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवदानही दिले होते. मात्र आज, मंगळवारी सकाळी आणखी एक पिल्लू विहिरीत मृतावस्थेत पाण्यात तरंगताना आढळून आले.
गव्याची तीन पिल्ले अंदाज न आल्याने विहिरीत पडली होती. त्यातील दोन पिल्ले वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत दोरीच्या साह्याने बाहेर काढली. रेस्क्यू टीमने दोन पिल्लांना जीवदान दिले पण तिसऱ्या पिल्ला बाबत कोणालाच माहिती मिळाली नाही. त्यामुळेच ही टीम निघून गेली.
गव्याची पिल्ले पडलेली ही विहिर तब्बल चाळीस फूट खोल आहे. या विहिरीत चिखल देखील असल्याने एक पिल्लू बुडल्याने थेट तळाला गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आज ते फुगल्याने वर आल्याने स्थानिकांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. वनविभागाला याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत पिल्लाला बाहेर काढले. त्यानंतर त्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करून घेण्यात आले. त्या पिल्लाचा मृत्यू कशामुळे झाला याचा वनविभागाकडून शोध घेतला जाणार आहे.
विहिरीला जाळी बसवणार
नरेंद्र डोंगरातून गवारेडयाचा हा कळप रात्रीच्या वेळी सावंतवाडी शिरोडा मार्गावरून थेट माजगाव मध्ये येतो. हा कळप पाण्याच्या शोधात येत असावा असा अंदाज आहे. यादरम्यान, वाटेवरील विहिरीत पिल्ले पडली. वनविभागाकडून त्या विहिरीला जाळी बसवण्यात येणार असल्याचे सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी सांगितले.