चिपळूणमध्ये दोन मुलींवर वार
By admin | Published: February 23, 2016 12:51 AM2016-02-23T00:51:18+5:302016-02-23T00:51:18+5:30
दुचाकीवरून हल्ला
चिपळूण : पावणेदोन तासांच्या फरकात दोन अल्पवयीन मुलींवर वार करण्यात आल्याचा प्रकार चिपळूण शहरालगतच्या परिसरात रविवारी रात्री घडला.
या दोन्ही घटनास्थळांमध्ये अंतर असले तरी दोन्ही प्रकारांमधील हल्लेखोर एकच असल्याचा संशय आहे. त्याने दुचाकीवरून जाता-जाता वार केला असल्याने दोन्ही घटनांमध्ये युवतींच्या डाव्या हातावर वार
झाला आहे. शहरातील गुहागर बायपास रस्त्यावर हायपर मार्केट परिसरात पहिली घटना रविवारी रात्री ८.३० वाजता घडली आणि त्यानंतर पावणेदोन तासांनी रात्री १०.१५ वाजता खेर्डी शिवाजीनगर येथे दुसरी घटना घडली. दोन्ही जखमी मुलींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यातील एकीला घरी सोडण्यात आले, तर दुसरीवर उपचार सुरू आहेत.
रविवारी रात्री ८.३० च्या दरम्यान पौर्णिमा लक्ष्मण कदम (१४, वाणी आळी- चिपळूण) ही मुलगी चिपळूण- गुहागर पर्यायी मार्गावरील हायपर मार्केटमध्ये कपडे खरेदी करून आपल्या घरी परत जात होती. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञाताने तिच्या डाव्या हाताच्या दंडावर धारदार शस्त्राने वार केला. हातातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तिला तातडीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वार केल्यानंतर दुचाकीस्वार अंधाराचा फायदा घेत भरधाव वेगाने महामार्गावरून निघून गेला.
दुसरा प्रकार खेर्डी शिवाजीनगर येथे चिपळूण-कऱ्हाड मार्गावर झाला. रात्री १०.१५च्या दरम्यान विद्या विकास पालांडे (३७, रा. खेर्डी शिवाजीनगर) या जेवण झाल्यानंतर आपली मुलगी शीतल (१७) हिच्यासह शतपावली करत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञाताने शीतलच्या डाव्या हाताच्या दंडावर धारदार शस्त्राने वार केला. हा वार खोलवर झाल्याने त्यांनी आरडाओरडा केल्यावर ग्रामस्थ गोळा झाले. परंतु तत्पूर्वी अंधाराचा फायदा घेत दुचाकीस्वार पसार झाला. त्याच्याकडे स्कूटीसारखी दुचाकी असल्याचे शीतलने पोलिसांना सांगितले.
दोघींनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शीतलला ३५ पेक्षा जास्त टाके पडले आहेत. उपचारानंतर तिला सोमवारी घरी सोडण्यात आले. पौर्णिमाला ४० पेक्षा जास्त टाके पडले असून, तिच्यावर अद्याप उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
हल्ला विकृताकडून?
या दोन्ही घटना एकसारख्या असल्या तरी त्या दोन मुलींचा परस्परांशी संबंध नाही. त्यामुळे हा प्रकार करणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या विकृत असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारची घटना चिपळूण परिसरात प्रथमच घडली असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर नाटेकर अधिक तपास करीत आहेत.