दोनशे गावे, चार संरक्षक
By admin | Published: August 30, 2015 10:48 PM2015-08-30T22:48:41+5:302015-08-30T22:48:41+5:30
खेड तालुका : वनकर्मचारी विम्यापासून वंचित
श्रीकांत चाळके- खेड --तालुक्यातील वन विभागांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. खेड तालुक्यात २०० गावांतील वनांचे संरक्षण करण्याचे काम केवळ ४ वनसंरक्षक करीत आहेत. डोंगराळ असलेला हा तालुका भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असल्याने या ४ वनसंरक्षकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एवढेच नव्हे तर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यास कर्मचाऱ्यांना विमाही मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.तालुक्यात १ वनरक्षक तब्बल ५० गावांतील वनांचे संरक्षण करीत आहे़ शिवाय वन विभागाखेरीज या वनसंरक्षकांना मालकी क्षेत्रातही बरेचसे काम करावे लागते. काही परिमंडळे, परिक्षेत्र आणि नियतक्षेत्रामध्ये काम करावे लागते.़ तालुक्यातील या कर्मचाऱ्यांना तर दापोली आणि चिपळूण येथील परिक्षेत्र कार्यालयाअंतर्गतही काम करावे लागते. कामाचा अतिरिक्त बोजा या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. अनेक गावांमध्ये मालकी वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने कामाचा अतिरिक्त बोजा वाढतो. या मालकी वनक्षेत्रामध्येही वन्य प्राण्यांचा वावर असल्याने सातत्याने गावांच्या संपर्कात राहावे लागते. अशावेळी दररोज ६० किमीपेक्षा जास्त अंतरावर देखरेख ठेवावी लागते. याकरिता वाहन गरजेचे आहे. या विभागामध्ये खेड तालुक्यासाठी एकही वाहन नाही. वनसंरक्षकांना स्वत:च्या दुचाकीवरूनच घटनास्थळी जावे लागते. विविध प्रकारच्या अपुऱ्या साधनसामुग्रीअभावी या वनसंरक्षकांना वन्यप्राणी हाताळण्याचे काम करावे लागते. बिबट्या विहिरीत पडणे, त्याची शिकार होणे आणि तो फासकीत अडकणे अशा विविध घटनांच्या वेळी प्रथम वनसंरक्षकांना पोेहोचवावे लागते. कामाचा व्याप पाहता या विभागाला तालुकानिहाय चारचाकी वाहन देणे अनिवार्य झाले आहे. वन्यप्राण्यांकडून कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्यास तसेच शासकीय कामानिमित्त प्रवास झाल्यास या प्रवासादरम्यान अपघात झाल्यास या कर्मचाऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही. तशी तरतूदही नाही. या विविध असुविधांनी ग्रस्त असलेल्या या वनसंरक्षकांना सातत्याने असहकार्याची आणि असुरक्षिततेची जाणीव होत असल्याने त्यांचे मनोबलही खचत आहे. वन्यप्राण्यांपासून मानवी जीविताचे आणि वृक्षवेलीचे संरक्षण करण्याचे काम अहोरात्र करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना शासनाने आवश्यक अशा सुविधा देण्याची मागणी होत आहे.
अतिरिक्त कामांचाही बोजा
या वनरक्षकांना नियतक्षेत्रामध्ये शासकीय वनक्षेत्रात वृक्ष संरक्षण करणे, अतिक्रमण होऊ न देणे, पशुसंवर्धनाची कामे करणे, वन्यप्राण्यांची शिकार होऊ न देणे, विनापरवाना लाकूडतोड आणि वाहतूक होऊ न देणे, सतत गस्त घालणे, वृक्षतोड परवाना चौकशी, मूल्यांकन चौकशी, नोटीसा पोहोच करणे, पशुधन हत्येप्रकरणी चौकशी करणे, मनुष्यावर हल्लाप्रकरणी चौकशी करणे, पीक नुकसानाची चौकशी करणे आणि पंचनामा करणे आणि ते संबंधित कार्यालयात सादर करणे, पर्यायी वृक्षलागवड करणे, वनपालाला तक्रार अर्ज करून चौकशी करणे, गुन्ह्याकामी चौकशी करणे, नुकसानभरपाईचे धनादेश पोहोच करणे, आवश्यक त्यावेळी पोलीस स्थानकात संपर्क साधणे शिवाय विविध प्रसंगांमध्ये कौटुुंबिक कलह निर्माण झाल्यास सुवर्णमध्य काढणे, अशी कामे करावी लागतात.