अपघातात दोन ठार

By admin | Published: May 30, 2014 12:54 AM2014-05-30T00:54:54+5:302014-05-30T00:55:17+5:30

हुमरठ येथील घटना : टेम्पोची क्रुझरला धडक

Two killed in accident | अपघातात दोन ठार

अपघातात दोन ठार

Next

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर हुमरठ-पिंपळवाडी येथे टाटा टेम्पोची क्र्रुझर मॅक्सला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दोन ठार झाले आहेत. या अपघातात दोन गंभीर, तर अन्य सहाजण जखमी झाले आहेत. हा अपघात आज, गुरुवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. टाटा टेम्पोची जोरदार धडक बसल्याने क्र्रुझर मॅक्स गाडीचा चक्काचूर झाला आहे. याबाबत घटनास्थळ तसेच पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, कणकवलीवरून कोल्हापूरच्या दिशेने विजय प्रभाकर तेली (वय २२, रा. कलमठ) हा क्रुझर मॅक्स (एमएच १३ एन ७५५२) घेऊन आज सायंकाळी ५.३0 वाजण्याच्या सुमारास निघाला होता. हुमरठ पिंपळवाडी येथे ही मॅक्स गाडी पोहोचली असता मुंबईवरून गोव्याच्या दिशेने जाणार्‍या टाटा टेम्पोने (जीए 0६ टी ३0७६) आपल्या समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात मॅक्स गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, टेम्पोची समोरची दोन चाकेही तुटून खाली पडली होती. तर अपघातानंतर टेम्पोही रस्त्याच्या बाजूला उलटला होता. मॅक्स गाडीतून प्रवास करणारी विजया विष्णू दुधाळ (वय ३५, रा. सध्या कणकवली, मूळ सांगली) ही महिला जागीच ठार झाली, तर यशवंत रामा पडुळकर (वय ६0, रा. सध्या कणकवली, मूळ सांगली) हे गंभीर जखमी झाल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा काही वेळाने मृत्यू झाला. रूपाली भारत मोटे (वय ३0, कडुलकर चाळ, कणकवली) व विष्णू ज्ञानू दुधाळ (वय ४0, कणकवली) यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर अर्जुन रामा पडुळकर (वय ४0), अनिता आप्पासाहेब सरगर (वय ३५), काशिबाई शंकर दुधाळ (वय ४५, सर्व राहणार मूळ सांगली) तसेच टेम्पो चालक कांता लक्ष्मण मातोंडकर (वय ३८, गोवा), विजय प्रभाकर तेली, देवानंद आत्माराम परब (वय २२, वरवडे) हे जखमी झाले असून, या जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक जे. डी. मोरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हुमरठ येथील ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून तसेच त्यांच्या गाडीतून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. (वार्ताहर)

Web Title: Two killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.