आरामबस अपघातात दोन ठार

By admin | Published: September 4, 2016 11:39 PM2016-09-04T23:39:16+5:302016-09-04T23:39:16+5:30

आंजणारी घाटीतील दुर्घटना : गणेशभक्तांवर घाला; चालकाचे नियंत्रण सुटले

Two killed in an uncomfortable accident | आरामबस अपघातात दोन ठार

आरामबस अपघातात दोन ठार

Next

 लांजा : गणेशोत्सवासाठी मुंबईहून कुणकेश्वर (जि. सिंधुदुर्ग) येथे आपल्या गावी येणाऱ्या गणेशभक्तांची खासगी आरामबस आंजणारी घाटीत शंभर फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार झाले, तर तीनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी पहाटे तीन वाजता घडला आहे. या अपघातात १३ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
गणेशभक्तांना घेऊन परेल येथून ही आरामबस कुणकेश्वरला जाण्यासाठी शनिवारी रात्री मुंबईहून सुटली होती. चालक गणेश नारायण डामरे (वय ३८, कणकवली) हा भरधाव वेगाने ही बस (एमएच ४३ -एच ७५५४ ) चालवीत होता, असे प्रवाशांनी सांगितले. रविवारी पहाटे तीन वाजता आंजणारी घाट उतरत असताना एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले व रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन बस आदळली. त्यानंतर खोल दरीत गेली.
या अपघातात प्रकाश रावजी लब्धे (५४, विरार, मुंबई), कृष्णा दत्ताराम मुळ्ये (३५, राजापूर) हे दोघेजण जागीच ठार झाले आहेत, तर प्राजक्ता प्रकाश लब्धे (कुणकेश्वर), प्रथमेश प्रकाश लब्धे (कुणकेश्वर), शुभांगी राजेंद्र राड्ये (१९, तरळे, कणकवली) हे तीनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना अधिक उपचारांकरिता रत्नागिरीला हलविण्यात आले आहे.
चिराग मधुसूदन पालकर (१६, कुणकेश्वर), मेघा कृष्णा राणे (७२, साळशी, देवगड), दिगंबर नारायण राणे (७०, परेल), प्रकाश रमेश मळदे (२७, कुणकेश्वर), सुनीता सुनील पवार (४०, देवगड), संजय मोतीराम वरद (२४, शिरगाव, देवगड), मंगेश मेघशाम साइम (२२, कुणकेश्वर), हरीशचंद्र जगन्नाथ शेड्ये (७७, कुणकेश्वर, कातवण), रूपाली रूपेश कदम (२५, कुणकेश्वर), रूपेश मारुती कदम (३६, कुणकेश्वर), संगीत विठ्ठल वाळके (५०, कुणकेश्वर), दीपक प्रकाश गुरव (३०, नांदगाव), सुश्मिता संतोष नारिंगेकर (३४, कुणकेश्वर) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले.
रविवारी पहाटे धुकेही पडले होते. अशाच वेळी तीन वाजता हा अपघात झाला. आंजणारी घाटीच्या सुरुवातीलाच वाहतूक नियंत्रणासाठी ठेवण्यात आलेल्या पोलिसांना ही घटना कळताच अवघ्या काही मिनिटांतच बचावकार्य सुरूझाले. सर्वप्रथम बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
अपघातग्रस्त बसमध्ये अनेक लहान मुले होती, पण त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघात झाल्यानंतर काही वेळातच उपविभागीय पोलिस अधिकारी मारुती जगताप, लांजा पोलिस निरीक्षक रवींद्र साळोंखे, उपनिरीक्षक पंडित पाटील, प्रमोद जाधव सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश शिरगावकर यांच्यासह संतोष झापडेकर, संजय मुरकर, शांताराम पंदेरे, शशिकांत सावंत, प्रकाश पंगरीकर, सतीश साळवी यांच्यासह हातखंबा आणि खास गणपती सणासाठी आलेल्या अन्य जिल्ह्यांतील पोलिसांनी विशेष मेहनत घेतली.
जखमींना लांजा ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर त्या ठिकाणी उपचार अधिक गतीने होण्यासाठी लांजा शहरातील डॉक्टरांच्या टीममध्ये अमित देसाई, प्रशांत पाटील,
सुहास खानविलकर, जयप्रकाश कामत यांनीही रुग्णालयात येऊन जखमींवर उपचार केले. या अपघातातील जखमींना घटनास्थळावरून लांजा येथे आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रुग्णवाहिका, नरेंद्र महाराज संस्थान, शासकीय रुग्णवाहिकांनी मदत केली. मृतदेहांचे लांजा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून ते नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
या अपघाताची पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, उपअधीक्षक तुषार पाटील, परिवहन अधिकारी विनोद वसईकर, लांजा तहसीलदार मारुती कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. (प्रतिनिधी)
अनेकांचे मदतीचे हात
४लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत जाधव व पदाधिकारी मुंबईहून येणाऱ्या वाहनचालकांना आणि प्रवाशांना चहा बिस्कीट देण्यासाठी वेरळ येथे हजर होते. त्यांना या घटनेची खबर मिळताच त्या सर्व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली. त्यानंतर लांजातील राजू हळदणकर, राजू जाधव, शिवाप्पा उकळी, मंगेश लांजेकर, प्रसाद भाईशेट्ये, रणजित सार्दळ, सुजित भुर्के, अनंत आयरे, तयब मेमन, प्रसाद वासुरकर, रवी पवार या धाडशी तरुणांनीदेखील घटनास्थळी जाऊन अतिशय मेहनत घेऊन बसमध्ये अडकलेले प्रवासी व मृतदेह बाहेर काढले.
बसचालक-मालकावर गुन्हा
या अपघातास जबाबदार चालक गणेश डामरे आणि बसमालक राजेश विश्वनाथ गवाणकर (रा. सांताक्रूज, मुंबई) या दोघांवर लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
दोन झाडे चिरली
हा अपघात एवढा भीषण होता की, दोन झाडे चिरत ही बस दरीत कोसळली. खचाखच भरलेल्या बसमधील प्रवाशांनी अक्षरश: एकच आक्रोश केला. नेमके काय झाले हेच कळत नव्हते. त्यातील काही प्रवाशांनी दरीतून वर येऊन अपघाताची कल्पना दिली.

Web Title: Two killed in an uncomfortable accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.