रेल्वे केबल चोरीप्रकरणातील आणखी दोन आरोपी अटकेत, कणकवली पोलिसांची कारवाई
By सुधीर राणे | Published: July 17, 2024 11:48 AM2024-07-17T11:48:48+5:302024-07-17T11:50:10+5:30
कणकवली : कणकवली बॅ. नाथ पै नगर येथील रेल्वे ट्रॅक्शनच्या वर्कशॉपमधील खोलीच्या शटरचे लॉक कोणत्यातरी हत्याराने तोडून आतील २ ...
कणकवली : कणकवली बॅ. नाथ पै नगर येथील रेल्वे ट्रॅक्शनच्या वर्कशॉपमधील खोलीच्या शटरचे लॉक कोणत्यातरी हत्याराने तोडून आतील २ लाख ३४ हजार किंमतीचे तांब्याच्या तारेचे बंडल व कंडक्टरचे तुकडे चोरल्या प्रकरणी कणकवली पोलिसांनी सातारा येथून आणखीन दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक करण्यात आली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
संतोष सावकार जाधव (वय-२३) व श्रीकांत सावकार जाधव (२२, दोघे रा. तासगाव, सांगली) अशी त्यांची नावे असून या दोघांना सातारा येथून ताब्यात घेण्यात आले.
यापूर्वी या चोरीप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील हंबीरराव सावळा गोसावी (४०, रा, कोडोली, ता.पन्हाळा) या भंगार विक्रेत्या संशयिताला अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप गाडीही ताब्यात घेतली आहे. हंबीरराव याला न्यायालयाने १८ जुलै पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
ही चोरीची घटना २२ जून रोजी सायंकाळी ७.३० ते २४ जून सकाळी ९ या मुदतीत घडली होती. याबाबतची तक्रार त्या वर्कशॉपमधील रेल्वेचे विभागीय वरिष्ठ अभियंता संजीवकुमार बेलवलकर यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत. या चोरी प्रकरणातील आणखीन काही संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत.