संतोष परब हल्लाप्रकरणातील आणखीन दोन आरोपीना अखेर अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 10:44 PM2022-03-24T22:44:26+5:302022-03-24T22:44:43+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर कणकवली येथे हल्ला झाला होता. या घटनेतील पसार असलेल्या पुणे येथील दोन्ही आरोपींना कणकवली पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी उशिरा अटक केली.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर कणकवली येथे हल्ला झाला होता. या घटनेतील पसार असलेल्या पुणे येथील दोन्ही आरोपींना कणकवली पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी उशिरा अटक केली. ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिगंबर देवणुरे (३४ ), धीरज व्यंकटेश जाधव (३६, दोन्ही रा.पुणे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना शुक्रवारी कणकवली न्यायालयात हजर केले जाणार आहे.
करंजे येथील मूळ रहिवासी असलेले संतोष परब हे सध्या कणकवली येथे रहातात. त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या गुन्ह्यात एकूण ११ आरोपी पोलिसांनी तपासा दरम्यान निष्पन्न केले होते. त्यातील पाचजण न्यायालयीन कोठडीत असून चौघांची जामिनावर मुक्तता झाली आहे . तर आता पसार असलेले उर्वरीत दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.
संतोष परब यांच्यावर हल्ल्याची घटना १ डिसेंबर २०२१ रोजी नरडवे रोडवर रेल्वे स्टेशननजीक घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तीन आरोपींना अटक केली होती. तसेच एका आरोपीला दोन दिवसांनी अटक करण्यात आली होती. तर आणखी एक आरोपी सचिन सातपुते याला काही दिवसांनी दिल्ली येथे अटक करण्यात आली होती.
त्याचप्रमाणे संतोष परब हल्लाप्रकरणात संशयित म्हणून आमदार नितेश राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, आमदार राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांचीही नावे होती. त्यातील मनिष दळवी यांना जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला होता. तर आमदार नितेश राणे, संदेश सावंत, राकेश परब यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. त्यानंतर सध्या ते जामिनावर मुक्त आहेत. या गुन्ह्यात ज्ञानेश्वर उर्फ माऊली देवणुरे आणि धीरज जाधव हे पुण्यातील दोन्ही आरोपी पसार झाले होते. अखेर तीन महिन्यानंतर या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना शुक्रवारी कणकवली न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी सांगितले.