माकडतापाचे आणखी दोन बळी
By admin | Published: March 29, 2017 11:36 PM2017-03-29T23:36:59+5:302017-03-29T23:36:59+5:30
मृतांची संख्या आठ : साथीने थैमान घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण
बांदा : बांदा परिसरात गेले काही दिवस माकडतापाने थैमान घातले असून, या तापाने बुधवारी आणखी दोघाजणांचा बळी घेतला आहे. बुधवारी सकाळी दीपाली दिलीप नाईक (वय ४५, रा. निगुडे-तेलीवाडी) व सूदन शंकर परब (४४, रा. बांदा-सटमटवाडी) यांचा माकडतापाने गोवा-बांबोळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांवर गोवा-बांबोळी येथे गेले काही दिवस उपचार सुरू होते. आतापर्यंत बांदा परिसरात माकडतापाने आठजणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
आतापर्यंत बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातून १८८ तापसरीच्या रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी ६९ रुग्णांना माकडतापाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तापसरीच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त ४ डॉक्टर, ५ आरोग्य कर्मचारी, ३ सुपरवायझर, ४ आरोग्यसेवक कार्यरत आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापसरीच्या रुग्णांमध्ये घट झाली होती. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा तापसरीच्या साथीने डोके वर काढले आहे. निगुडे-तेलीवाडी येथील दीपाली नाईक या गाळेल येथे माकडतापबाधित क्षेत्रात काजू गोळा करण्यासाठी जात असत. १२ मार्च रोजी त्यांना ताप आला होता. १३ मार्च रोजी त्यांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना आजुला (म्हापसा-गोवा) येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने अखेर त्यांना बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेही त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नव्हती. अखेर सतरा दिवसांच्या झुंजीनंतर बुधवारी सकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू माकडतापानेच झाला असल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. नाईक यांची आर्थिक स्थिती खूपच हलाखीची आहे. नाईक यांचे पतीही मोलमजुरीची कामे करतात. (प्रतिनिधी)