दोन राज्यमंत्री आमने-सामने
By admin | Published: November 13, 2016 11:32 PM2016-11-13T23:32:36+5:302016-11-13T23:32:36+5:30
सावंतवाडी नगरपालिका निवडणूक : केसरकर, चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला
अनंत जाधव ल्ल सावंतवाडी
राज्याच्या मंत्रिमंडळातील महायुतीतीलच दोन राज्यमंत्री सध्या सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने ऐकामेकांसमोर उभे ठाकले आहेत. यात शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, तर भाजपचे बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा समावेश आहे. सावंतवाडी हा मंत्री केसरकरांचा बालेकिल्ला असल्याने भाजपने नगरपालिका निवडणूक प्रतिष्ठेची बनवली असून, राज्याचे लक्ष सावंतवाडीवर लागून राहिले आहे.
केंद्रात व राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण व देवगड येथे नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना- भाजपमध्ये युती झाली. पण सावंतवाडी व वेंगुर्ले नगरपालिकेत युती झाली नसून, काही ठिकाणी आघाडीमध्ये कुरबुरी असल्याने तिरंगी व चौरंगी लढती होत आहेत. निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात शिवसेना-भाजपचे स्थानिक नेते युतीवरून आमने-सामने आले होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात युती तुटल्याने दोन्ही पक्ष ऐकामेकांच्या विरोधात लढणार आहेत.
यापूर्वी दीपक केसरकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना शिवसेना तसेच भाजपबरोबर महायुती करून निवडणूक लढवित होते व एकहाती सत्ता आणत होते. त्यावेळी त्यांचा प्रतिस्पर्धी पक्ष एकमेव काँग्रेस होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने सावंतवाडी शहरात शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. सावंतवाडीतील केसरकर समर्थक १७ पैकी १६ नगसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे शहरात शिवसेनेचे संख्याबळ चांगल्यापैकी वाढले आहे.
त्यामुळे युतीच्या बोलणीत संख्याबळात शिवसेनेने भाजपला अवघ्या दोन ते तीन जागा देण्याचे निश्चित केले होते. पण, भाजपने शिवसेनेची आॅफर नाकारत स्वबळाचा नारा दिल्याने पालिका निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे. त्यातच भाजपने संपूर्ण कोकणची जबाबदारी ही बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर दिली असून, ते गेले आठवडाभर सावंतवाडीतच तळ ठोकून बसले आहेत. त्यांनी भाजप शहरात अल्प आहे, हा कार्यकर्त्यांच्या मनातील न्यूनगंड काढून टाकत पहिल्या टप्प्यातच नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी उमेदवार उभे करीत शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे.
त्यामुळे सावंतवाडीत गेली अनेक वर्षे होणारी दुरंगी लढत आता तिरंगी लढत झाली असून, त्यात अनेकांना लॉटरी लागू शकते. तर काहींचा पत्ता कटही होऊ शकतो. तरीही युतीचे नेते आम्ही मैत्रिपूर्ण लढत लढणार, असे सांगत आहेत. पालिकेत शिवसेना सत्ताधारी असल्याने भाजपने शिवसेनेच्या विरोधातच जोरदार आघाडी उघडल्याने मैत्रिपूर्ण लढत शेवटच्या काही दिवसांत विरोधकांमध्ये परावर्तीत होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे दोन्हीकडच्या नेत्यांना आतापासूनच सबुरीने घ्यावे लागणार आहे.
कल्याण-डोंबिवलीचा अनुभव गाठीशी
भाजपने सावंतवाडीची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर दिली आहे, ते बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपला ६ वरून ४४ जुदाई आकडा गाठून दिल्याने त्यांचे राज्यात वजन वाढले आहे. भाजपला सावंतवाडीचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यातून घेऊन दिल्यास चव्हाण हेच किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. त्यांना माजी आमदार राजन तेली, युवा नेते संदेश पारकर यांचीही साथ लाभत आहे.