दोन वाड्या अंधारात
By admin | Published: July 2, 2016 11:31 PM2016-07-02T23:31:18+5:302016-07-02T23:31:18+5:30
सोनाळीतील घटना : झाड कोसळून वीजेचे खांब मोडले; मीटर जळून नुकसान
वैभववाडी : सोनाळी चव्हाणवाडीला शनिवारी दुपारी वादळाचा फटका बसला. वादळात आंब्याचे झाड वीजवाहिन्यांवर कोसळल्याने दोन खांब मोडून पडले. त्यामुळे चव्हाणवाडी व पालकरवाडीचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे तीन घरातील वीजेचे मिटर जळून नुकसान झाले आहे. कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपडत होते. मात्र, सरपंचांनी कल्पना देऊनसुद्धा उशीरापर्यंत महावितरणचे अधिकारी सोनाळीत फिरकले नव्हते.
दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या वादळामुळे सोनाळी चव्हाणवाडी येथील परशुराम कुडाळकर व महादेव नेमण यांच्या घराच्यामध्ये आंब्याचे झाड वीज वाहिन्यांवर कोसळले. त्यामुळे वीजेचे दोन खांब मोडून पडल्याने चव्हाणवाडी व पालकरवाडीचा वीजपुरवठा खंडित झाला. तर सूर्यकांत मांडवकर, गंगाराम नेमन व सुरेश नेमण यांच्या घरातील वीज मीटर जळून नुकसान झाले.
वीज वाहिन्यांवर झाड कोसळून वीजेचे खांब मोडून पडल्याची माहिती मिळाल्यानंतर वीज कर्मचारी समीर रावराणे, गणेश पाटेकर, अविनाश गुरव, सुहास गुरव घटनास्थळी पोहोचले. त्यांनी उशिरापर्यंत प्रयत्न करुन चव्हाणवाडी, पालकरवाडी वगळून उर्वरित भागात वीज पुरवठा सुरळीत केला. मात्र, सरपंच समाधान जाधव यांनी वादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची कल्पना देऊनसुद्धा महावितरणचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत सोनाळीत फिरकले नाहीत. त्याबद्दल सरपंच जाधव तसेच वीज मीटर जळालेल्या ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)