काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांत खडाजंगी

By admin | Published: May 18, 2015 10:54 PM2015-05-18T22:54:01+5:302015-05-19T00:49:30+5:30

दोडामार्ग-तळेखोल येथील प्रकार : ठेकेदारांना बदनाम करीत असल्याचा समाजकल्याण सभापतींवर आरोप

Two office bearers of Congress | काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांत खडाजंगी

काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांत खडाजंगी

Next

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील विहिरींची कामे योग्य पध्दतीने होत नसल्याचा आरोप समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने सोमवारी दोडामार्ग तालुक्यातील विहिरीच्या कामांची पाहणी केली. यावेळी तळेखोले याठिकाणी पाहणी करतेवेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर व समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्यात पाहणी दौऱ्यावरून जोरदार शाब्दिक खटके उडाले. जाधव तालुक्यातील ठेकेदारांना बदनाम करीत असल्याचा आरोप निंबाळकर यांनी केला. तर जाधव यांनी असा कोणताही हेतू आपला नसून कामे पारदर्शक झाली पाहिजेत, हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. मात्र, या पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने काँगे्रसमधील अंतर्गत वाद मात्र पुन्हा एकदा समोर आले. जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची बैठक काही दिवसांपूर्वीच पार पडली. या बैठकीत समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी दोडामार्ग तालुक्यात पाणी पुरवठा योजनेंतर्गत सुरू असलेल्या विहिरींची कामे योग्य पध्दतीने होत नसल्याचा आरोप केला होता. तसेच मणेरी इनामदारवाडी येथील विहीर कोसळल्याने चौकशी करण्याची मागणी केली होती. शासन निकषानुसार विहिरीची खोली बारा मीटर असणे आवश्यक असताना १० किंवा ११ मीटरच खोदाई केली जाते, असा आरोप जाधव यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. देशमुख यांना चौेकशीचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सोमवारी ही समिती दोडामार्ग तालुक्यात दाखल झाली. यावेळी देशमुख यांच्यासोबत सावंतवाडीचे उपविभागीय अभियंता एस. एच. उबाळे, शाखा अभियंता संदेश राणे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम या समितीने मणेरी इनामदारवाडी येथील विहिरीची पाहणी केली. याठिकाणी प्रथम मारलेली विहीर बुजवून पुन्हा दुसरीकडे मारल्याचे दिसून आले. यावर स्पष्टीकरण देताना संबंधित ठेकेदाराने माती चांगली दर्जाची नसल्याने विहीर पुन्हा पुन्हा कोसळत होती. त्यामुळे शाखा अभियंता राणे यांना कल्पना देऊन त्यानंतर याच जमिनीचा सातबारा असलेल्या जागेत विहीर खोदली, असे सांगितले. राणे यांनीही ते मान्य केले. मात्र, याची कल्पना उपविभागीय अभियंत्यांना देण्यात आली नसल्याने समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी कामाची चौकशी करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. (प्रतिनिधी)


काँग्रेसअंतर्गत वाद चव्हाट्यावर

तळेखोल कुंभारवाडी व म्हावळंकरवाडी येथील विहिरीच्या कामांचीदेखील पाहणी करण्यात आली. यावेळी कुंभारवाडीतील विहिरीच्या पाहणीवेळी ठेकेदार तथा काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर व समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांच्यात कामाच्या पाहणीवरून शाब्दिक खटके उडाले. जाधव यांच्या चौकशीच्या मागणीमुळे तालुक्यातील ठेकेदारांची बदनामी झाली, असा आरोप निंबाळकर यांनी करीत नाराजी व्यक्त केली. यावेळी पक्ष संघटनेवरूनही शाब्दिक बाचाबाची झाली. या चौकशीवजा पाहणी दौऱ्याची माहिती पक्षसंघटनेला देणे आवश्यक होते. परंतु तुम्ही ती दिली नाहीत, असे निंबाळकर म्हणाले. यावर बोलताना जाधव यांनी, जिल्हा परिषद अध्यक्षांनी मला जे सांगितले होते, ते काम मी केले. तुमच्या कामाची चौकशी करण्याचा उद्देश नव्हता. विहिरीची कामे चांगली झाली पाहिजे, हाच मूळ हेतू असल्याचे ते म्हणाले. यावेळी दोहोंमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन पक्षनेतृत्वापर्यंत तक्रार केली जाईल, असे दोघांनीही सांगितले. मात्र, यानिमित्ताने काँगे्रेसमधील पक्षांतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आला असून, पक्षनेतृत्व कोणती भूमिका घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Two office bearers of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.