Sindhudurg: विनापरवाना रायफल, काडतुसांसह फिरणारे पन्हाळ्यातील दोघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 11:57 AM2024-03-02T11:57:02+5:302024-03-02T11:57:26+5:30
रायफल, जिवंत काडतुसे, मॅग्झिन, दुचाकी केली जप्त
वैभववाडी : विनापरवाना बंदूक आणि जिवंत काडतुसे घेऊन दुचाकीवरून फिरणाऱ्या सागर दगडू नाईक (४५) आणि अभय रणजित पाटील (३०, दोघेही रा. यवलुज, ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर) यांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार १ मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हेत थड्याची मळी येथे करण्यात आली. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
वैभववाडी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलिस हवालदार एस.डी. कांबळे, कर्मचारी डी.सी. कानसे, जितेंद्र कोलते हे दुपारी भुईबावडा ते नेर्ले मार्गावर गस्तीवर होते. भुईबावड्यापासून काही अतंरावर त्यांना दोन युवक दुचाकीवर संशयास्पद दिसून आले.
परंतु, त्यांच्यापर्यंत पोलिस पोहोचण्याआधीच ते नेर्लेच्या दिशेने दुचाकीवरून पळून जाऊ लागले. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढल्याने त्या दोघांचा पाठलाग करून त्यांना हेत येथील थडीची मळी येथे गाठले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे विनापरवाना एक रायफल आणि जिवंत काडतुसे आढळून आली.
याप्रकरणी सागर नाईक आणि अभय पाटील यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ७५ हजार रुपयांची रायफल, तीन हजार रुपयांची जिवंत काडतुसे, १० हजार रुपयांची मॅग्झिन आणि ४० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणाचा तपास तपास सहायक पोलिस निरीक्षक अवसरमोल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.