Sindhudurg: रानडुकराच्या मासांची विक्री करणारे फोंडाघाट येथील दोघेजण ताब्यात
By सुधीर राणे | Published: February 22, 2024 02:31 PM2024-02-22T14:31:01+5:302024-02-22T14:31:43+5:30
कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई
कणकवली : फोंडाघाट, कासारवाडी येथे अवैधरित्या शिकार करुन रानडुकर या वन्यप्राण्याचे मांस विकत असल्याची कणकवली वनक्षेत्रपाल यांना गुप्त माहिती मिळाली होती. वनपाल, वनरक्षक यांच्या समवेत तत्काळ घटनास्थळी जावून वस्तुस्थीतीची खात्री केली तसेच दोघांना ताब्यात घेतले आहे.
गुरुनाथ मधुकर येंडे व चंद्रकांत शांताराम शिरवलकर (दोघेही रा. फोंडा) अशी त्यांची नावे आहेत. गुरुनाथ येंडे यांच्या राहत्या घराच्या पडवीमध्ये रानडुकराचे मांस ठेवल्याचे वनाधिकाऱ्याना आढळुन आले. ते मांस काळ्या रंगाच्या ३७ पिशव्यामध्ये होते. ते ताब्यात घेण्यात आले. त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर गुरुनाथ येंडे यांच्यासह चंद्रकांत शिरवलकर यांनी ते मांस राधानगरी येथाल विजय नामक व्यक्तीकडून बुधवारी सकाळी घेतल्याचे सांगितले. ते विकत घेतलेले मांस बारिक तुकडे करुन विक्री करण्याच्या उद्देशाने विकत घेतले होते. तसेच विजय याला दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते.
गुरुनाथ येंडे यांच्यासह चंद्रकांत शिरवलकर यांनी वन्यप्राणी रानडुकराचे मांस अवैधरित्या खरेदीचा व्यवहार करुन तो बाजारात विकण्याचा त्यांचा हेतू होता. त्या दोघानी गुन्हा कबुल केल्याने त्यांच्यावर वन्यप्राणी रानडुकराच्या मृत्युस व शिकारीस कारणीभुत ठरल्याने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ नुसार गुन्हा नोंद केला आहे.
या गुन्ह्याबाबत उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी व सहाय्यक वनसंरक्षक डॉ.सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर, वनपरिमंडळ अधिकारी धुळु कोळेकर, अतुल खोत व वनसेवक सुधाकर सावंत यांनी कारवाई केली.