८ पासून दोन आरक्षित रेल्वेगाड्या
By admin | Published: August 11, 2015 11:13 PM2015-08-11T23:13:23+5:302015-08-11T23:13:23+5:30
पनवेल - चिपळूण डेमू गाडी
रत्नागिरी : गणेशोत्सव काळात गणेशभक्तांची गर्दी कमी करण्यासाठी व त्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वेमार्गावरून ८ ते २८ सप्टेंबर या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव व लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी या दोन विशेष आरक्षित गाड्या, तर पनवेल ते चिपळूण अशी एक डेमू रेल्वे गाडी सोडली जाणार आहे. याबाबतची घोषणा कोकण रेल्वेकडून करण्यात आली आहे. रेल्वे क्र. ०१००५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव गाडी ८ सप्टेंबरपासून रात्री ००.५५ वाजता सुटणार असून, ती मडगावला दुपारी २.४० वाजता पोहोचणार आहे, तर रेल्वे क्रमांक ०१००६ ही दुपारी ३.२५ वाजता मडगावहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे रवाना होणार आहे. ही विशेष आरक्षित रेल्वे आठवड्यातून गुरुवारवगळता अन्य सहा दिवस धावणार आहे. रेल्वे क्रमांक ०१०२५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी ही ८ सप्टेंबरला पहाटे ०५.३० वाजता करमाळीसाठी रवाना होणार आहे. ही गाडी करमाळी येथे सायंकाळी ५ वाजता पोहोचणार आहे. परतीची ही गाडी ९ सप्टेंबरला पहाटे ५.५० वाजता करमाळी येथून मुंबईकडे रवाना होईल व त्याच दिवशी सायंकाळी ५.४५ वाजता पोहोचेल. विशेष आरक्षित दोन्ही गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे, थिवीम व करमाळी येथे थांबणार आहेत. या रेल्वेगाड्यांचा गणेशभक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
पनवेल - चिपळूण डेमू गाडी
पनवेल - चिपळूण - पनवेल मार्गावर ४, ५, ६, ८, ९, ११, १२, १३, १५, १६, १७, १९, २०, २१, २३, २४, २६, २७, २९, ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत डेमू गाडी धावणार आहे. ही गाडी सकाळी ११.१० वाजता पनवेलहून सुटेल व चिपळूणला दुपारी ४ वाजता पोहोचेल. चिपळूणहून ही गाडी सायंकाळी ५.३० वाजता पनवेलकडे रवाना होईल व रात्री १०.३० वाजता पाहोचेल. ही गाडी रोहा, कोलाड, इंदापूर रोड, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, खेड व अंजनी या स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीला १२ डबे राहणार आहेत.