विहे घाटात दोघा ट्रकचाकांना लुटले
By admin | Published: April 27, 2015 11:54 PM2015-04-27T23:54:21+5:302015-04-28T00:28:24+5:30
रविवारी रात्रीची घटना : अज्ञात लुटारू, जीवे मारण्याची धमकी
मल्हारपेठ : मल्हारपेठ, ता. पाटण येथील पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीतील विहे घाटात रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात लुटारूंनी जीवे मारण्याची धमकी देऊन दोन ट्रक चालकांना लुटून ३२ हजार व मोबाईल, साहित्याची चोरी केली. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.मल्हारपेठ येथून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विहे घाटात रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पंढरपूरहून दापोलीकडे द्राक्षे घेऊन निघालेला ट्रक (एमएच ०८ डब्ल्यू ५४१९) विहे येथील स्मशानभूमीजवळ महामार्गावर दुचाकी आडवी मारून ट्रक थांबविला. अज्ञात दोघेजण ट्रकमध्ये घुसून चालक धर्मेंद्र बाळकृष्ण तांबे (वय ४५, रा. वाकोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी ) यांच्या खिशातील रोख रक्कम २६ हजार ५०० रुपये व मोबाईल हिसकावून घेतला. पुढे नहिंबे-चिरंबेच्या गावाजवळ दोघेही ट्रकमधून खाली उतरले व तो ट्रक सोडून दिला.
त्यानंतर पुन्हा अज्ञात दोघेही विहे स्मशानभूमीजवळ आले.दुसरा ट्रक (एमएच०४ सीपी ४६०१) हा कऱ्हाडहून चिपळूणकडे नायलॉन साहित्य घेऊन निघाला होता. त्यास त्याचप्रकारे दोघांनी अडविले. त्यावेळी ट्रकचालक शब्बीर बंदरकर (वय ३५, रा. चिपळूण, जि. रत्नागिरी ) याच्याकडील पाकीट हिसकावून घेतले. त्या पाकिटातील चार हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याच ट्रकमध्ये बसून विहे घाटात आणून सोडले. या लुटीनंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले.
ट्रक चालकाला लुटण्याचे हे दोन्ही प्रकार रविवारी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान घडले आहेत. याबाबत ट्रकचालक धर्मेंद्र तांबे यांनी मल्हारपेठ दूरक्षेत्रात तक्रार दिली आहे. पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा नोंद केला. पोलीस अज्ञतांचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)
चिपळूण मार्गावर चोरीत वाढ...
मल्हारपेठ परिसरात पहिल्यांदाच अशा प्रकारे वाहन अडवून लुटण्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात निसरे फाटा दरम्यान एका कंपनीच्या साबण पावडरच्या ट्रकमधील अंदाजे दीड लाखाचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. तर गेल्या महिन्यात पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कदमवाडीजवळ घरासमोर लावलेल्या ट्रकमधून खादी कपडे, गोळ्या, बिस्किटे, महागडे फर्निचर साहित्य अज्ञात चोरट्यांनी लुटले होते. कऱ्हाड-चिपळूण मार्गावर वाहनांची संख्या वाढली असून, गेल्या चार महिन्यांत चिपळूणकडे जाणाऱ्याच वाहनांची लूट केल्याची उलट-सुलट चर्चा परिसरातील ग्रामस्थांच्यात होत आहे.